सिन्नर (प्रतिनिधी) :- सिन्नरहून भरधाव वेगात ठाणगावकडे जात असताना कारवरील ताबा सुटल्याने ती अनियंत्रित होऊन रस्त्याकडेला असलेल्या एका टेकडावरुन उडून थेट कांदा चाळीवर जाऊन पडली.
ही घटना आज दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडली. आटकवडे – डुबेरे शिवारात झालेल्या या भीषण अपघातात चालकासह अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे.
या अपघातात विवेक विठ्ठल माळी (वय ३०, रा. दोडी) आणि रामदास काशिनाथ हडगुंडे (वय ४४, रा. दापूर ता. सिन्नर) हे दोघे जखमी झाले आहेत.
माळी यांच्या डोक्याला आणि गालाला जबर मार लागल्याने त्यांच्यावर सिन्नर येथील खाजगी रुग्णालयात उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी एसएमबीटी रुग्णालयात हलवण्यात आले. हे दोघे आज त्यांच्या एमएच 15 जेसी 9427 या क्रमांकाच्या कारने सिन्नरहून डुबेरेच्या दिशेने जात होते. भरधाव वेगात असलेली कार रस्त्याच्या कडेला असलेल्या एका उंचवट्यावरुन उडून ती बाभळीच्या झाडावर आदळली.
कारचा वेग जोरात असल्याने छत झाडाला घासून तेथून ती थेट रस्त्यापासून २० फूट अंतरावर असलेल्या कृष्णा वाघ यांच्या कांदा चाळीवर जाऊन पलटी झाली.
दरम्यान, कार आदळल्यानंतर मोठा आवाज झाल्याने स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. कांदा चाळीवर चढून गाडीतील दोघा जखमींना सुरक्षित रित्या बाहेर काढून उपचारासाठी तत्काळ सिन्नर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.