नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) :- नवले कॉलनी रोड वरील प्रेसच्या मोकळ्या मैदानात झालेल्या युवकाच्या खुन प्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी अवघ्या तीन ते चार तासात मारेकऱ्यांना ताब्यात घेतले.
जुन्या कुरापती वरून मित्रांनी त्याला मारल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत अधिक माहिती अशी की, आज दुपारच्या सुमारास नवले कॉलनीत जाणाऱ्या रोड लगत असलेल्या भारत प्रतिभूती मुद्राणालयातील मोकळ्या मैदानात स्टेशनवाडी सिन्नर फाटा येथे राहणाऱ्या अजय शंकर भंडारी (वय 24) या युवकाचा मृतदेह मिळून आला.
डोक्यात दगड घालून व हातावर धारदार शस्त्राने वार केल्याने हा खून झाल्याचे निष्पन्न झाले. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी, पोलीस निरीक्षक बडे साहेब नाईकवाडे, गुन्हे शोध पथकाचे अधिकारी, कर्मचारी यांनी धाव घेतली. कुठलेही सीसीटीव्ही फुटेज किंवा प्रत्यक्षदर्शी नसल्याने गुन्ह्याचा उलगडा होणे मोठी कसरत होती. "कानून के हात बडे लंबे होते है" त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी सखोल तपास करून यातील प्रमुख मारेकरी तुषार संजय खरे (वय १८) यास ताब्यात घेतले.
त्याला विश्वासात घेऊन विचारले असता, काल दुपारपासून अजय भंडारी व मारेकरी दारू पिऊन फिरत होते. जुना वाद तुषार व अजय मध्ये होता व त्याचा बदला तुषारला घ्यायचा होता. जयंती उत्सवमध्ये नाचून झाल्यानंतर सोबत दारू पिऊ आणि घरी जाऊ असे सांगून तुषार व त्याच्या मित्रांनी अजयला नवले कॉलनी रोडवर नेत त्याच्या डोक्यात दगड घातला व धारदार शस्त्राने त्याच्या हातावर, बोटांवर वार केले व मैदानात त्याला फेकून दिले. रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे अजय भंडारी याचा मृत्यू झाला.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांनी नाशिकरोड पोलिसांचे कौतुक केले.