राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना दरदिवशी महिलांची छेडछाड, महिला अत्याचार अशा अनेक घटना सतत घडत असतात. दरम्यान केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणींची छेड काढल्याचा प्रकार मुक्ताईनगरमधील कोथडी येथील यात्र दरम्यान घडला होता. रविवारी हे प्रकरण समोर आल्यानंतर दोन गुन्हे दाखल करण्यात आले. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली असून या प्रकरणात एकूण सात आरोपी असल्याचे समोर आले.

दरम्यान, पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. त्यात मुख्य आरोपी अनिकेत भोई याचाही समावेश आहे. अनिकेत भोई हा मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे कट्टर समर्थक आहे. तसेच रावेर लोकसभा मतदार संघाचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख छोटूभाई यांचा पुतण्या आहे.
खासदार रक्षा खडसे यांच्या मुली सोबत गेलेल्या अंगरक्षक पोलिसाला धक्काबुक्की केल्याप्रकरणी एक गुन्हा मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दाखल केला होता. दुसरा गुन्हा मुलींची छेड काढल्या प्रकरणात होता. या प्रकरणात अनिकेत भोई, किरण माळी आणि अनुज पाटील यांच्यासह एक अल्पवयीन मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. किरण माळी हा सुद्धा शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा नातेवाईक असल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी चार जणांना अटक करण्यात आली आहे. फरार आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली. अनिकेत भोई हा या गुन्ह्यातला मुख्य आरोपी आहे. त्याच्या विरोधात यापूर्वी मारहाणीसह वेगवेगळे असे चार गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. दरम्यान, आरोपींची काही राजकीय पार्श्वभूमी आहे का असे विचारले असता पोलीस अधीक्षकांनी त्यावर बोलणे टाळले.
दरम्यान, या प्रकरणी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. आरोपी माझे कार्यकर्ते असले तरी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. आपण कोणालाही पाठिशी घालणार नाही, असे त्यांनी म्हटले.