राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले असून सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार कडून अनेक महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस आज पार पडला. दरम्यान आता राजकारणातील घडामोडींना वेग आला असून यावेळी शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांनी हजेरी लावली. तानाजी सावंत यांच्या कार्यकाळातील तब्बल 3190 कोटींच्या कामांना राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिल्याची चर्चा आहे. या चर्चांवर नुकतंच तानाजी सावंत यांनी भाष्य केलं.

त्यांना आरोग्य विभागाच्या कामांच्या स्थगितीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी थेट भाष्य केले. राज्याच्या मंत्रिमंडळाने किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अशा कोणत्याही पद्धतीने स्थगिती दिलेली नाही, असे स्पष्टीकरण तानाजी सावंत यांनी दिले. तानाजी सावंत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
“गेल्या दोन दिवसांपासून कामांच्या स्थगितीबाबत जो विषय सुरु आहे, त्या विषयाची माहिती घेणं गरजेचं आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मी चर्चा केली. अशा कोणत्याही गोष्टीला मंत्रिमंडळाने किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिलेली नाही. आता 3190 कोटींचा घोटाळा झाला, त्याआधी 108 गाड्याच्या बाबतीत 10 हजार, 12 हजार कोटींचा घोटाळा झाला असे आरोप झाले. मात्र, यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीतून एक रुपयाही कुठे गेलेला नाही. पण अभासी जगात जगायचं आणि घोटाळे झाले म्हणायचे. एखाद्याला बदनाम करायचं हे चुकीचं आहे. मी आरोग्यमंत्री असताना न भूतो न भविष्यति असे तब्बल 24 महिन्यांत 42 निर्णय आरोग्य विभागात घेतले आहेत”, असे तानाजी सावंत म्हणाले.
“माझ्या कार्यकाळात अनेक चांगले कामं केली. 70 कोटींत महाराष्ट्रातील 2500 हजार हॉस्पिटल साफसफाई करणं सोप्पं होतं का? वैद्यकीय विभागाची ऑर्डर झाली होती. माझ्या खात्याने 84 रु पर स्क्वेअरफुटने ठरवलं. हायकोर्टात आपलेच काही लोकं गेली. 12 लोकांनी कॉम्पिट केलं, वर्क ऑर्डर झाली, एमओयू झालं, महाराष्ट्र शासनातील एक रुपयाचाही कॉर्टक्ट दिलं. हॉस्पिटल मध्ये येणारा रोजंदारी करणारा वर्ग आहे. मोफत उपचार सुरू केले. अडीच हजार हॉस्पिटल स्वच्छता ही 70 कोटीत शक्य आहे का?” असा सवालही तानाजी सावंत यांनी विचारला.