अनेक महिन्यांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या चोरट्याला पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. ठाणे जिल्ह्यात घरफोड्या करत धुमाकूळ घालणाऱ्या एका हायप्रोफाईल सराईत चोरट्याला मानपाडा पोलिसांनी उत्तर प्रदेश येथून फिल्मी स्टाईलने बेड्या ठोकल्यात. राजेश राजभर असे या चोरट्याचे नाव असून त्याच्या विरोधात ठाणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात तब्बल 22 गुन्हे दाखल आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली परिसरात काही दिवसांपूर्वी घरफोडीची घटना घडली होती. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी सुनील कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी सुनील तारमळे, अविनाश वनवे यांच्या पथकाने या आरोपीचा शोध सुरू केला होता.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे राजेश राजपूत हे नाव समोर आले. छोटा राजेश राजपूत हा उत्तर प्रदेश मधील आजमगड रायपूर येथे लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस त्या ठिकाणी पोहचले मात्र राजेशचा थांगपत्ता लागत नव्हता. अखेर पोलिसांनी याच परिसरातील एका वीटभट्टीवर वेश बदलून काम करण्याचा निर्णय घेतला. याच दरम्यान दोन दिवसानंतर अखेर राजेशचा ठाव ठिकाणा मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ सापळा रचत बेड्या ठोकल्या.
राजेश राजभर हा मूळचा उत्तर प्रदेशचा असून अंबरनाथमध्ये राहायला होता. बंद घरांची रेखी करत तो घरफोडी करायचा. चोरी केल्यानंतर चोरीतून मिळालेले पैसे घेऊन तो उत्तर प्रदेशला पळून जात होता. राजेशने चोरीतून मिळालेल्या पैशांमधून आपल्या मूळ गावी अलिशान बंगला बांधला होता तसेच महागड्या दुचाक्या देखील खरेदी केल्या होत्या. या चोरीच्या पैशातून राजेश हाय फाय लाईफ जगत होता.
राजेश विरोधात मानपाडा , महात्मा फुले ,पनवेल ,अर्नाळा सागरी पोलीस ठाणे, अंबरनाथ, कोळशेवाडी ,बदलापूर ,शिवाजीनगर डोंबिवली, कल्याण तालुका शिरवळ पोलीस ठाण्यात तब्बल 22 गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी राजे सोडून 21 लाख 26 हजाराचे दागिने हस्तगत केले राजेश कडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता असून पोलीस पुढील तपास करत आहेत.