नाशिक :- 35 हजार रुपयांची लाच घेताना पोलीस हवालदाराला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
रवींद्र बाळासाहेब मल्ले असे लाच घेणाऱ्या हवालदाराचे नाव आहे. मल्ले हे तालुका पोलीस ठाण्यात नेमणुकीस असून सध्या त्यांना विल्होळी पोलीस चौकी येथे नेमण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितलेली अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांचा ट्रक विल्होळी पोलीस चौकीत जमा करण्यात आला होता. तो सोडण्यासाठी मल्ले यांनी तक्रारदारकडे 1 लाख रुपयांची लाच मागितली. तडजोडी अंती 70 हजार रुपये घेण्याचे ठरले. त्यापैकी पहिला हफ्ता म्हणून 35 हजार रुपये पंचवटीतील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक तरुण मोहन तोडी यांच्याकडे देण्यास तक्रारदाराला सांगितले.
त्याप्रमाणे काल हिरावाडी भागातील ओम नागपूर ट्रान्सपोर्ट या ठिकाणी तरुण तोडी याने 35 हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. मल्ले व तोडी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.