सातपूर - सोमवारी दुपारी अचानक झालेल्या अवकाळी पावसाने सातपूर परिसरात जनजीवन विस्कळीत झाले. जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक झाडे उन्मळून पडली, काहींच्या घरांवर तर काही रस्त्यावर आडवी आली. परिणामी वाहतूक ठप्प झाली आणि नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
सातपूर त्र्यंबकेश्वर मुख्य रस्त्यावर हॉटेल जिंजर समोर व श्रीराम चौकात झाडे कोसळल्याने वाहतूक कोंडी झाली होती. तसेच, जाधव संकुलातील राजश्री पार्क येथील गार्डन शेजारील झाड पडल्यामुळे परिसरातील रहिवाशांना त्रास सहन करावा लागला. स्थानिक रहिवासी संदीप गोवरधने यांनी सांगितले की, या धोकादायक झाडाच्या छाटणीसाठी सातपूर महापालिकेकडे अनेक वेळा अर्ज करूनही दुर्लक्ष झाले, त्यामुळेच आजचा हा प्रकार घडल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, सातपूर मळे परिसरातील गोरक्षनाथ रोडवर राहणाऱ्या शशी घाटोळ यांच्या घरावरील पत्र्याचे शेड वाऱ्याने उडून गेले. त्यामुळे घरातील संसारोपयोगी वस्तूंना मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र महापालिकेच्या दुर्लक्षामुळे भविष्यात मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिकांनी प्रशासनाकडे अधिक जबाबदारीने काम करण्याची मागणी केली आहे.