15 हजार रुपयांची लाच घेताना सहाय्यक फौजदारास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
शिवाजी ढगु बाविस्कर (वय 52) असे लाच घेणाऱ्या चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदाराचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचे चुलत भाऊ व त्याचा मित्र यांना दि. 23 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लासूर गावाजवळ पोलिसांनी अडवले होते. त्यांची मोटार सायकल अडवून तुमच्या जवळ गांजा आहे अशी खबर मिळाली आहे, तुम्ही स्टेशनला चला असे सांगितले. जर गांजाची केस व मोटार सायकल सोडवायची असेल तर 75 हजार रुपये आम्हाला द्यावे लागतील असे त्याने सांगितले.
तडजोडीअंती तक्रारदार यांच्या नातेवाईकाकडुन पहाटे 4 वाजता 30 हजार रुपये घेतले व मोटार सायकल त्यांनी ठेवून घेतली. जर तुम्हाला मोटार सायकल सोडवायची असेल तर तुम्हाला आणखी 20000 हजार रुपये द्यावे लागतीत असे सांगितले. त्यानंतर दि 24 ऑगस्ट रोजी तक्रारदार यांच्याकडे बाविस्कर यांनी गांजाची केस न करण्यासाठी व मोटार सायकल सोडण्यासाठी 20000 हजार रुपयेची मागणी केली व तडजोडअंती 15000 हजार रुपये स्विकारण्याची तयारी दर्शविली.
त्याप्रमाणे आलोसे यांनी उर्वरीत 15000 हजार रुपये आज चोपडा शहरात स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यावर चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.