नवीन नाशिक (प्रतिनिधी) :- पाथर्डी गाव येथील शिवपुराण कथेसाठी गेलेल्या 15 महिलांच्या गळ्यांतील सुमारे 21 तोळे वजनाचे सोन्याचे विविध दागिने अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन चोरून नेले.
याबाबत स्वाती दिलीप अहिरराव (वय 57, रा. मालपाणी सॅफ्रॉन सोसायटी, पाथर्डी फाटा) ही महिला पाथर्डी गाव येथे सुरू असलेल्या शिवमहापुराण कथेसाठी मंडपात प्रवेश करण्यासाठी रांगेत उभी होती. त्यावेळी महिलेच्या पाठीमागून आलेल्या अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरून नेली.
त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या ठिकाणी सोनाली हितेश अमृतकर (वय 30, रा. वासननगर, नाशिक) यांची 13 ग्रॅम वजनाची पोत, कल्पना शशिकांत कुमटेकर (रा. रविवार पेठ, नाशिक) यांची 12 ग्रॅम वजनाची, शोभा पुरुषोत्तम मते (रा. गंगापूर रोड), वर्षा वसंत पवार (वय 42, रा. जुने सिडको) यांच्या गळ्यातील 18 ग्रॅम वजनाची पोत, सरला भिकाजी लिंडाईत (वय 53, रा. रुंगटा, चित्रकूट, इंदिरानगर) यांची 15 ग्रॅम वजनाची पोत, अश्विनी शंकर वराडे (वय 34, रा. पंचवटी) यांची शॉर्ट सोन्याची पोत, छाया योगेश मटाले (वय 36, रा. कामटवाडा) यांचे अडीच तोळ्यांचे मंगळसूत्र, शिरीषकुमार तानाजी चव्हाण यांची अडीच तोळ्यांची चेन,
पुष्पा रमेश कानकाटे (वय 45, रा. श्रीकृष्णनगर, पंचवटी) यांचे 17 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, शोभा बहिरू जावळे (रा. हरसूल) यांचे 15 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, शशिकला प्रकाश रावते (रा. अंबरनाथ) यांची 16 ग्रॅम वजनाची पोत, अरुणाबाई नाना पाटील (रा. नाशिकरोड) यांची 14 ग्रॅम वजनाची पोत, विजया दादा बरे (रा. पाथर्डी फाटा) यांची 17 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन चोरून नेली. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.