चेन्नई :- तमिळनाडूच्या मदुराई रेल्वे स्थानकाजवळ लखनऊहून रामेश्वरमला जात असलेल्या रेल्वेच्या एका बोगीला लागलेल्या आगीत 9 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती मदुराईतील रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. या अपघातात 20 प्रवासी भाजले आहेत.
आज पहाटे सव्वा पाच वाजेच्या सुमारास आगीची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांना समजली. त्यावेळी ही रेल्वे मदुराई यार्ड जंक्शनजवळ थांबली होती. काही प्रवासी अवैधपणे गॅस सिलिंडर घेऊन रेल्वेच्या बोगीत चढले होते, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.
रेल्वेच्या बोगीला लागलेल्या आगीचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये काही प्रवाशांचा ओरडण्याचा आवाज येत आहे. दरम्यान शेजारच्या रुळांवरुन एक रेल्वे जाते. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून प्रयत्नांची पराकाष्ठा करत आग नियंत्रणात आणली. आगीत ही बोगी पूर्णपणे जळाली. काही प्रवासी अवैधरित्या सिलिंडरची वाहतूक करीत होत. त्यामुळे हा प्रकार घडल्याचे रेल्वेच्या तपास अधिकाऱ्यांंकडून सांगण्यात आले. कोणताही ज्वलनशील पदार्थ, वस्तू घेऊन रेल्वेच्या डब्यात चढू नये, असा नियम आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टेशन अधिकाऱ्याने मदुराई यार्ड जंक्शनजवळ टूरिस्ट बोगिला आग लागल्याची माहिती पहाटेच्या सुमारास दिली. त्यानंतर ही माहिती तातडीने अग्निशमन दलाला कळविण्यात आली. अग्निशमन दलाचे बंब पावणे सहाच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले. सव्वा सातपर्यंत आग विझवण्यात आली. टूरिस्ट कोच व्यतिरिक्त अन्य कोणत्याही डब्याला आग लागली नाही. आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला कोच वेगळा करुन मदुराई स्टॅबलिंग लाईनवर ठेवण्यात आला आहे.
प्रायव्हेट पार्टी कोचमधील प्रवासी गॅस सिलिंडर अवैधरित्या घेऊन जात होते.
त्याचमुळे आग लागली रेल्वे गाडीला आग लागल्याचे दिसताच बोगीतील काही प्रवासी फलाटावरच उतरले. तर काही जणांना गाडीतून उतरता आले नाही म्हणून त्यांना आगीची झळ सोसावी लागली. यातील काही जखमींना रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले असून, काहींना प्रथमोपचार करुन सोडून देण्यात आले आहे.