नाशिक : भरदिवसा सिडको परिसरात प्राणघातक हल्ला करून एका युवकाची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक हत्येने नाशिक शहर पुन्हा हादरुन गेले आहे. या आठवड्यातील ही तिसरी खुनाची घटना आहे.
कार्बन नाका परिसरात ही घटना घडली. एका तरुणाची चाकूने वार करत हत्या करण्यात आली असून या प्रकरणात दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. विश्वनाथ सोनवणे पाटील (वय 26) असे हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, काल रात्री दारुची पार्टी सुरू असताना मित्रांमध्ये किरकोळ वाद झाले. या वादात शमशेर शेख आणि दिपक सोनवणे या दोघांनी मिळून विश्वनाथ पाटील वर प्राणघातक हल्ला करत या तरुणाला संपवले.
खून केल्यानंतर अपघाताचा बनाव रचण्यासाठी या दोन्ही तरुणांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून पळ काढण्याचा प्रयत्न केला.
मात्र रुग्णालयातील पोलिस चौकीवर ड्युटीवर असलेल्या पोलिसांना संशय आल्याने त्यांना ताब्यात घेतले. यावेळी दोघांची विचारपुस केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांचा संशय बळावला आणि चौकीवर असलेले पोलिस हवालदार पि एस जगताप आणि पोलिस कॉन्स्टेबल शरद पवार यांनी दोघांना ताब्यात घेऊन गंगापूर पोलिसांच्या ताब्यात दिले. नंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलघडा झाला.