सिन्नर बस स्टॅण्डवर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या घटनेत तालुक्यातील दापूर येथील नऊ वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झालाय. तर मुलाची आई व इतर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. सिन्नर आगारातून देवपूरसाठी निघणाऱ्या बसचे ब्रेक फेल झाल्याने बस थेट फलटावर चढल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. या दुर्घटनेत ९ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झालाय.
मिळालेल्या माहितीनुसार, सिन्नर बस स्टॅण्डवरून बस क्रमांक एमएच १३ सीयू ८२६७ ही बस देवपूरसाठी सकाळी ११ वाजता सुटणार होती. १०.४५ वाजता चालक आगारातून बस फलटावर लावण्यासाठी आणत असताना अचानक त्याला बसचे ब्रेक झाल्याचे लक्षात आले. त्याने बसवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र बसवरील त्याचे नियंत्रण सुटल्याने बस थेट फलटावर चढली.
यावेळी फलटावर गौरी योगेश बोऱ्हाडे (३०) त्यांचा ९ वर्षीय मुलगा आदर्श योगेश बोऱ्हाडे, विठाबाई ज्ञानेश्वर भालेराव, ज्ञानेश्वर रामकृष्ण भालेराव रा. तामकटवाडी यांच्यासह काही प्रवासी उभे होते. दरम्यान, बसची जोरदार धडक बसल्याने आदर्शचा मृत्यू झाला. तर आई गौरी, विठाबाई, ज्ञानेश्वर हे गंभीर जखमी झाले.
यानंतर जखमींना तात्काळ नाशिक येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रस्त्यातच आदर्शचा मृत्यू झाला. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी येत बस चालकास ताब्यात घेतले. तर चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांकडून होत आहे.