नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) - नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कायमस्वरूपी नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष परवेज कोकणी यांच्यासह बँकेचे विभागीय अधिकारी व पी. ए. ने एका तरुणास 15 लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी आशिष केशव बनकर (रा. उत्सव निवास, काठे गल्ली, द्वारका) हे नोकरीच्या शोधात होते. त्यादरम्यान, मार्च 2016 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत आरोपी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळातील परवेझ मोहंमद युसूफ कोकणी, डिव्हिजनल ऑफिसर भास्कर शंकर बोराडे व पी. ए. मोबिन सलिम मिर्झा यांनी संगनमत करून फिर्यादीशी संपर्क साधला. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत क्लर्कपदावर पर्मनंट नोकरी लावून देतो, असे आमिष बनकर यांना दाखविले.
त्यानंतर फिर्यादीचा विश्वास संपादन करून जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयात बनकर यांच्याकडून 15 लाख रुपये रोख स्वरूपात स्वीकारले, तसेच फेब्रुवारी 2025 मध्ये आरोपी परवेझ कोकणी यांच्या राहत्या घरी फिर्यादी बनकर हे नोकरीसंदर्भात विचारणा करण्यासाठी गेले असता आरोपी कोकणी याने हायकोर्टाने आपल्या बाजूने निकाल दिला आहे. तुमचे पर्मनंटचे नियुक्तिपत्रही तयार आहे, असे सांगून त्यांच्याकडे फिर्यादीच्या नावाने असलेले बँकेच्या एम. डी. यांच्या सहीचे व शिक्क्याचे पर्मनंट करण्यात आल्याचे बनावट नियुक्तिपत्र दाखविले.
त्यानंतर फिर्यादी बनकर यांनी पर्मनंटची ऑर्डर मिळाली नाही, म्हणून नोव्हेंबर 2025 च्या पहिल्या आठवड्यात आरोपी परवेझ कोकणी यांच्याकडे पैसे परत मागितले असता त्यांनी फिर्यादींना शिवीगाळ व दमदाटी करून तेथून हाकलून दिले, तसेच फिर्यादी यांचा विश्वासघात करून 15 लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात परवेझ कोकणीसह भास्कर बोराडे, मोबिन सलिम मिर्झा (सर्व रा. नाशिक) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर करीत आहेत.