नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : नाशिक महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी गेल्या पंचवार्षिकपेक्षा शहरात ४०० मतदान केंद्रे वाढून सुमारे १६०० मतदान केंद्र निश्चित करण्यात येणार असून, त्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
नाशिक महानगर पालिका निवडणुकीसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संभाव्य स्ट्रॉंग रूम, मतमोजणी केंद्रांसाठी पूर्व पश्चिम विभागातील सभागृहांची पाहणी करण्यात आली. नागरिकांना मतदानासाठी अधिक सुलभ सुविधा उपलब्ध होण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. लोकसंख्येत वाढ झाल्याने मतदान केंद्रेही वाढविण्यात आली आहेत.
शहरातील सर्व सहा विभागांना स्वतंत्र निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केले जाणार आहेत. प्रत्येक विभागाच्या कार्यालयात त्यांची सोय मनपाकडून करण्यात येणार आहे. याची पाहणी मनपा प्रशासनाकडून करण्यात आली. केंद्रांवरील सुविधा, व्यवस्थापन, सुरक्षा आणि मतदानासाठी लागणारी साधने तपासण्यात येत असून, केंद्रांवर आवश्यक कर्मचारी आणि मदतनिसांची उपलब्धता सुनिश्चित करण्यावर भर देण्यात येत आहे.
नागरिकांसाठी सोयीसुविधा वाढविण्याचा उद्देश असून, गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी आणि सुरक्षेची पातळी उंचावण्यासाठी ही पावले घेतली जात आहेत.