गंजमाळच्या श्रमिकनगर झोपडपट्टीत आग, शॉर्टसर्किटमुळे घडली दुर्घटना
गंजमाळच्या श्रमिकनगर झोपडपट्टीत आग, शॉर्टसर्किटमुळे घडली दुर्घटना
img
सुधीर कुलकर्णी
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) - गंजमाळ येथील श्रमिकनगर झोपडपट्टीत आज सकाळी शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागल्याने रहिवाशांची धावपळ उडाली. प्रसंगावधान राखल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. वेळेत अग्निशमन बंब आल्यामुळे आग आटोक्यात आली.

गंजमाळ येथील श्रमिकनगर झोपडपट्टीत आज सकाळी सात वाजेच्या सुमारास एका घरात शॉर्टसर्किट झाल्याने तेथील झोपडपट्टीतील घरांना आग लागली. या ठिकाणी श्रमजीवी नागरिक राहत असल्यामुळे सकाळच्या कामाला जाण्याच्या धावपळीत एका घरातून धूर येत असल्याचे निदर्शनास येताच आरडाओरड सुरू झाली. रहिवाशांंनी धाव घेत प्रसंगावधान राखत घरातील सिलिंडर घेऊन बाहेर पडण्याचा मार्ग स्वीकारला.

कामगार वर्ग सकाळी आवरण्याच्या गडबडीत असतानाच ही आग लागल्याने प्रत्येक घरात फारसे कोणी नव्हते. मात्र आग भडकू नये यासाठी आठ-दहा घरातील नागरिकांनी सिलिंडरसह घराबाहेर पडणे पसंत केले. अग्नीशामक दलाला फोनद्वारे ही  माहिती कळविण्यात आली. शिंगाडा तलाव येथून झोपडपट्टी जवळच असल्याने काही मिनिटांतच अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाले. रहिवाशांना दूर सारत ही आग आटोक्यात आणली.

 या आगीमध्ये सुमारे आठ ते दहा घरांचे नुकसान झाले असून कोणतीही जीवित हानी झालेली नाही. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे प्रथम दर्शनी बोलले जात असून अधिक चौकशी केली जात आहे. अचानक लागलेल्या या आगीत रुक्मिणीबाई हिरामण गहिरे, नंदाबाई रूपचंंद सुट्टे, जमुनाबाई प्रभाकर भगूरे, अफजलखान समशेर खान, सलीम युसूफ शेख, नफिसा अल्ताफ शेख, अक्रम बाबर खान, भाडेकरी सबा शरीब शेख, मंदाबाई अंकुश शिंदे, नितीन अंकुश शिंदे, मनकर्णाबाई सदावर्ते, राधाबाई बाजीराव घोडे आदींच्या घरांचे या आगीमुळे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
Nashik |
इतर बातम्या
Join Whatsapp Group