गेल्या काही वर्षात नाशिक शहराचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. पण त्यासोबतच शहरात वाहतूक कोंडीचे प्रमाणही वाढले आहे. या वाहतूक कोंडीला नाशिककर वैतागले आहेत. शहरातील मुंबई नाका, द्वारका, संभाजीनगर रोड, पुणे रोड, मखमलबाद नाका , रामवाडी पूल याठिकाणी वाहतूक कोंडी होते.
१० मिनिटांच्या प्रवासासाठी अर्धा तास ते एक तास वेळ खर्च होतो.
आता नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्यामुळे वाहतूककोंडीचा प्रश्न आणखी भेडसावू शकतो. ज्या दृष्टीने प्रशासनाला पाऊले उचलणे गरजेचे झाले असतानाच या वाढत्या वाहतूककोंडीवर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून मोठं पाऊल उचलण्यात आले आहे.
सिंहस्थ कुंभमेळा आणि वाढत्या वाहतूककोंडी कमी करण्यासाठी नाशिकमध्ये ६६ किमीचा रिंग बांधला जाणार आहे, २०२७ च्या आधी नाशिकचा हा रिंग रोड तयार करण्याचा मास्टरप्लान सरकारकडून तयार करण्यात आला. नाशिकला तयार होणारा रिंग रोड ६६.१५ किमी लांबीचा असेल. याची अंदाजे किंमत ८ हजार कोटी इतकी असी शकते.
या प्रकल्पाला नुकतीच सरकारकडून मान्यता मिळाली आहे. एमएसआरडीसी ऐवजी एमएसआयडीसी मार्फत हा प्रोजेक्ट तयार होणार आहे. राज्य पायाभूत सुविधा विषयक मंत्रिमंडळ समितीने भूसंपादन खर्चाला मान्यता दिली आहे. त्यामुळे या रिंग रोड प्रकल्पाचे काम वेगात सुरू होऊ शकते.
राज्य पायाभूत सुविधा विषयक मंत्रिमंडळ समितीने नाशिक रिंग रोडसाठी ३,६५९.४७ कोटी रुपयांच्या भूसंपादन खर्चाला मान्यता दिली आहे. ४,२६२.६४ कोटी रुपयांच्या अंदाजे बांधकाम खर्चाबाबत केंद्रासोबत चर्चा सुरू आहे. भूसंपादनासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणामार्फत निधी उपलब्ध करून दिला जाईल. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाशी (MoRTH) चर्चा पूर्ण झाल्यानंतर राज्य आणि केंद्र याबाबत सामंजस्य करार (MoU) होणार आहे.