राज्यात गेल्या काही चार-पाच दिवसांपासून वातावरण बदलले आहे. राज्यात कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. राज्यातील अनेक शहरांचा पारा दहा अंशाच्या खाली आला आहे. यावेळी शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण करणारी परिस्थिती आहे. राज्यात थंड वारे वाहत असताना अवकाळी पावसाचे संकट आले आहे. कोकणात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
नाशिक जिल्ह्यात यंदाच्या हिवाळ्यात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. नाशिकमधील निफाडचं तापमान 5 अंश सेल्सिअसपेक्षा कमी नोंदवलं गेलेय. राज्यात अनेक ठिकाणाचं तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली घसरलेय.
त्यामुळे कपाटात ठेवलेले स्वेटर लोकांनी पुन्हा एकदा बाहेर काढले. शेकोट्या पेटवल्या जात आहेत. पुढील दोन दिवस थंडीचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. नाशिकच्या निफाडमध्ये 4.4 तापमानाची नोंद झाली. तर पुण्याचा पारा 8.6 अंश सेल्सियसवर घसरला. मुंबईतील सांताक्रुजमधील किमान तापमान 17.8 अंश सेल्सिअस तर कुलाब्यात 20 अंश सेल्सिअसची नोंद झाली.
नाशिकमध्ये हुडहुडी -
जानेवारीच्या उत्तरार्धात नाशिक शहरात तापमान कमालीचे घसरले असून दिवसाही कमालीचा गारवा असल्याने सर्वत्र हुडहुडी पसरली आहे. नाशिकमध्ये मागील तीन दिवसांपासून पारा घसरला आहे. निफाडमध्ये 4.4 या नीच्चांकी तापमानाची नोंद तर नाशिकचा पारा 8.6 अंशावर घसरलाय.
निफाडमध्ये मंगळवारी 6.6 , बुधवारी 5.6 आणि आज 4.4 तपमानाची नोंद झाली आहे. नाशिकमध्ये मंगळवारी 10.1, बुधवारी 9.0 तर आज 8.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
दरम्यान या हिवाळ्यातील हा तापमानाचा नीच्चांक आहे. थंडीमुळे द्राक्षांना तडे तसेच द्राक्ष फुगवणीवर परिणाम होणार आहे. वाढत्या थंडीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात आले आहे.
राज्यात कुठे किती तापमानाची नोंद ?
बुलढाणा -11.6 अंश सेल्सिअस
भंडारा 10 अंश सेल्सिअस
अकोला 9.5 अंश सेल्सिअस
परभणी 7.5 अंश सेल्सिअस
धुळे 4.6 अंश सेल्सिअस
नागपुरात 8.7 अंश सेल्सिअस
यवतमाळ 9.0 अंश सेल्सिअस
मुंबई 17.8 अंश सेल्सिअस
निफाड 4.4 अंश सेल्सिअस
नाशिक 8.6 अंश सेल्सिअस
पुणे - 8.6 अंश सेल्सिअस
विरार 13.2 अंश सेल्सिअस
नवी मुंबई 15.5 अंश सेल्सिअस
पनवेल 14.3 अंश सेल्सिअस
ठाणे 15.3 अंश सेल्सिअस
कल्याण 13.7 अंश सेल्सिअस
सिंधुदुर्ग 10 अंशावर