Nashik : पार्ट टाईम जॉबचे आमिष भोवले; आठ तरुणांना 68 लाखांचा ऑनलाईन गंडा
Nashik : पार्ट टाईम जॉबचे आमिष भोवले; आठ तरुणांना 68 लाखांचा ऑनलाईन गंडा
img
दैनिक भ्रमर

 
नाशिक (प्रतिनिधी) :- पार्ट टाईम जॉबचे आमिष दाखवून दिलेले टास्क पूर्ण करण्याच्या बहाण्याने आठ तरुणांना एका अज्ञात भामट्याने 68 लाख 69 हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी प्रशांत अशोक आहिरे (वय 37, रा. ऋतिका हाईट्स, मेहेरधाम, पेठ रोड, नाशिक) हा उच्चशिक्षित तरुण व त्याचे इतर सहकारी पार्टटाईम जॉबच्या शोधात होते. हे सर्व जण ऑनलाईन पार्ट टाईम जॉब सर्च करीत असताना त्यांना वेगवेगळ्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकांवरून एका अज्ञात इसमाने पार्ट टाईम जॉबचे मेसेज पाठविले व दिलेले टास्क पूर्ण केल्यास त्या बदल्यात जादा पैसे मिळतील, असे आमिष दाखविले.

त्यामुळे फिर्यादी आहिरे याच्यासह त्याच्या इतर आठ सहकार्‍यांना अज्ञात आरोपींनी संगनमत करून वेळोवेळी व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकांवरून मेसेज पाठवून आमिष दाखविले, तसेच वेळोवेळी दिलेल्या टास्कची ऑर्डर पूर्ण करण्याकरिता या सुशिक्षित बेरोजगारांकडून वेळोवेळी 68 लाख 69 हजार रुपये विविध बँकांच्या खात्यांवर, तसेच यूपीआयच्या खात्यांवर वर्ग करण्यास भाग पाडले.

हा प्रकार दि. 18 ऑगस्ट ते 11 डिसेंबर 2023 या कालावधीत घडला. फिर्यादी अहिरे यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी दिलेल्या रकमेपोटी कुठलाही पार्ट टाईम जॉब मिळाला तर नाहीत, शिवाय त्यांना दिलेली रक्कमही परत केली नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर आहिरे यांनी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दिली असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group