नवीन नाशिक (प्रशांत निरंतर) :- कटकारस्थान रचून कंपनीमध्ये राईस पुलरच्या नावाखाली रेडिओ ॲक्टिव्हबाबत माहिती देऊन गुंतवणूक करण्यास भाग पाडून एका व्यावसायिकाची पश्चिम बंगालच्या भामट्यांनी साडेतीन कोटी रुपयांना फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी राहुल शांताराम सावळे (वय 45, रा. गितांजली कॉलनी, इंदिरानगर, नाशिक) हे व्यावसायिक आहेत. ते लॅण्ड डेव्हलपरचा व्यवसाय करतात. मात्र कोरोना काळात व्यवसाय मंदावल्याने त्यांनी नवीन काही तरी व्यवसाय करायचा म्हणून त्या व्यवसायाच्या शोधात ते होते. त्यादरम्यान 13 जुलै 2022 रोजी रघुवीर ओंकार संधू यांनी त्यांना फोन करुन सांगितले की, मी इनव्होल्टा कंपनीचा संचालक बोलतोय, तुम्हाला बिझनेसमध्ये जो काही तोटा झाला आहे त्यासाठी तुम्ही आमच्या कंपनीमध्ये साधारणत: 30 लाख रुपये गुंतवणूक करा, आमची कंपनी रेडी ॲक्टिव्ह मटेरियलमध्ये काम करते. तसेच आम्ही युरेनियम हा पदार्थ शोधून काढतो.
त्याचा वापर ॲटोनॉमिक एनर्जी तसेच डिफेन्स संस्थांमध्ये होतो. त्याची किंमत बाजारपेठेत कोटीच्या पुढे येते. ते खूप दुर्मिळ असते. आमच्याकडे आमच्या स्वत:चे रिसर्च सेंटर आहे. त्यासाठी खूप खर्च येत असतो. म्हणून आम्ही लोकांकडून इन्व्हेस्टमेंट स्वरुपात रक्कम स्वीकारुन त्यावर गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीला मोठ्याप्रमाणात मोबदला देतो. त्यामुळे तुम्ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला 100 कोटी रुपयांचा नफा मिळवून देऊ, असे पटवून दिले. मात्र जोपर्यंत हा व्यवहार होत नाही, तोपर्यंत याची कुठेही वाच्चता करु नका, अन्यथा भारत सरकार अथवा जागतिक बँकेकडून यावर कारवाई होऊ शकते, असे त्याने सांगितले.
त्यावर फिर्यादी सावळे यांनी माझ्याकडे सध्या ऐवढी रक्कम नाही, तुम्ही मला तुमच्या कंपनीचे सर्व डिटेल द्या, त्यानंतर मी विचार करुन सांगतो. पुन्हा 27 जुलै 2022 रोजी कांतीकुमार (रा. वकदा, कोलकाता) याचा फोन आला. इनव्होल्टा कंपनीकडून तुमचा नंबर मिळाला. ही कंपनी जे काही काम करते, त्यासंदर्भातील सर्व वस्तु माझ्याकडे आहे. परंतु माझ्याकडे इन्व्हेस्ट करण्यासाठी पैसे नाही, तुम्ही जर पैसे उपलब्ध करुन दिले तर आपल्या दोघांचा चांगला फायदा होईल, असे म्हणून सावळे यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर एक -दोन महिन्यांनी रघुवीर ओंकार संधू याने फोन करुन फिर्यादी सावळे यांना कोलकाता येथे येण्याचा आग्रह केला. त्यानंतर 6 सप्टेंबर 2022 रोजी पुन्हा एकदा फोन करुन फिर्यादी यांच्या मोबाईलवर कंपनीचा ॲड्रेस व लोकेशन पाठवले. त्यानंतर सावळे हे कोलकाता येथे गेले असता एअरपोर्टवर कंपनीचा माणूस त्यांना घेण्यासाठी आला.
त्यानंतर रघुवीर संधू याने फिर्यादी सावळे यांची कंपनीत असलेल्या चंदन बेरा, मुकेशकुमार आणि जयदीप पांडे यांच्याशी ओळख करुन दिली. यावेळी सर्व जण चंदन बेरा याच्या ऑफिसमध्ये बसलेले होते. त्या सर्वांनी फिर्यादी सावळे यांना डी.आर.डी.ओ.चे सर्टीफिकेट दाखवले. ॲटोनोमिक रेग्युलेटरी बोर्ड ऑफ इंडियाचे लायसन्स तसेच कंपनीशी संबंधित काही कागदपत्रे दाखवली. त्यानंतर या सर्व आरोपींनी मिळून तुम्ही लवकरात लवकर पैसे गुंतवणूक करा, त्यामुळे तुम्हाला पुढचा सेलरचा पार्ट सांभाळायचा आहे, अशा प्रकारे त्यांना वेगवेगळे आमिष दाखवून सावळे यांना आपल्या जाळ्यात ओढले.
त्यानुसार सावळे यांनी वेळोवेळी आरोपींनी सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे 3 कोटी 46 लाख वेगवेगळ्या बँक खात्यात तसेच रोख स्वरुपात दिले. दरम्यान 13 जुलै 2022 ते 5 एप्रिल 2024 या दोन वर्षांच्या कालावधीत चंदनकुमार बेरा (रा. न्यू टाऊननॉर्थ, पश्चिम बंगाल), तसेच यामध्ये सहभागी असलेले रघुवीरकुमार संधू (रा. विमाननगर, पुणे), मुकेश कुमार (रा. गोपालपुर, कोलकाता, पश्चिम बंगाल), कांतीकुमार (रा. वकदा मायापूर, कोलकाता), आशिष रॉय (रा. लेदर कंपाऊंडजवळ, कोलकाता) यांच्यासह त्यांचे साथीदार अरुण घोष, बोलोमन मिन्ट या सर्वांनी संगनमत करुन कटकारस्थान रचून फिर्यादी राहुल सावळे यांचा विश्वास संपादन करुन त्यांना कंपनीमध्ये राईस पुलरच्या नावाखाली रेडिॲक्टिव्हबाबत माहिती देऊन गुंतवणूक करण्यास भाग पाडले.
त्यानुसार सावळे यांनी 3 कोटी 46 लाख रुपयांची गुंतवणूक केली. मात्र या सर्व आरोपींनी या रकमेचा अपहार करुन त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात 8 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहे.