मनमाड (नैवेद्या बिदरी) :- मालेगावच्या संगमेश्वर परिसरात सोमवारी रात्रीच्या सुमारास मागील भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करत धारदार हत्याराने रफिक खान अन्वर खान या युवकास मारहाण करीत हत्या करून पळून गेले.
गुन्ह्यातील मुख्य आरोपीला अवघ्या दोन तासात मनमाड शहरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. या कामगिरीमुळे पोलीस प्रशासनाचे कौतुक होत असून या घटनेमुळे शहर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.१५ एप्रिल रोजी रात्रीचे सुमारास मालेगाव छावणी पोलीस स्थानक हद्दीतील संगमेश्वर परिसरात युवक रफिक खान अन्वर खान (रा. संगमेश्वर, मालेगाव) हा त्याचे दोन मित्रांसोबत मौलाना इसाक चौक कमानीच्या बाजुला उभा होता.
त्याचा मित्र नामे रफिक शहा अमिन शहा उर्फ लम्बा रफिक व त्याचेसोबत आलेला त्याचा एक अनोळखी जोडीदार अशा दोघांनी मिळुन, मागील भांडणाची कुरापत काढून रफिक खान यास शिवीगाळ करून, कोणत्यातरी धारदार हत्याराने त्याचे डोक्यावर, हातावर व मांडीवर वार करून हत्या केली. याबाबत मालेगाव छावणी पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र सदर प्रकरणातील आरोपी हे पळून गेले होते.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यातील आरोपीतांना तातडीने अटक करण्यासाठी मालेगाव छावणी पोलीस स्थानक व स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास आदेशित केले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सदर गुन्हयाचे समांतर तपासात गुप्त माहितीच्या द्वारे यातील मुख्य आरोपी रफिक शहा उर्फ लम्बा रफिक हा मनमाडच्या दिशेने एका दुचाकीवर जात असल्याचे खात्रीशीररित्या समजले.
त्यावरून स्थागुशाचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मनमाड शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातून सदर खुनाचे गुन्हयातील मुख्य आरोपी रफिक शहा अमिन शहा उर्फ लम्बा रफिक, वय २८, रा. संगमेश्वर,मालेगाव यास ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेवून विचारपुस केली असता, त्याने त्याचा साथीदार फैसल पुर्ण नाव माहित नाही याचेसह सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
सदर आरोपी रफिक शहा उर्फ लम्बा रफिक यास मालेगाव छावणी पोलीस स्थानकात हत्येच्या गुन्हयात हजर करण्यात आले असून त्याचा साथीदार फैसल याचा पोलीस पथक शोध घेत आहे. यातील आरोपी रफिक शहा उर्फ लम्बा रफिक याने गुन्हा घडल्यानंतर मालेगावातून पलायन केले होते, त्यास स्थागुशाचे पथकाने दोन तासांचे आत ताब्यात घेऊन त्याचेकडून गुन्हयात वापरलेली होण्डा युनिकॉर्न मोटर सायकल देखील हस्तगत केली आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती, सहा. पोलीस अधीक्षक तेघबीरसिंग संधु, सहा. पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, पोउनि संदिप पाटील, पोहवा चेतन संवत्सरकर, पोना शरद मोगल, योगेश कोळी, विशाल आव्हाड, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, सुभाष चोपडा, दत्ता माळी यांचे पथकाने सदर खुनाचे गुन्हयातील आरोपीस ताब्यात घेऊन कारवाई केली आहे.