६ ऑक्टोबर २०२४
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- शहरातील महात्मा गांधीरोड येथे राजस्थानी व्यावसायिकांच्या मोबाईल ॲक्सेसरीज दुकानांमध्ये नामांकित मोबाईल कंपन्यांचे बनावट स्पेअर पार्ट, ॲक्सेसरीजची सर्रासपणे विक्री होत असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या युनिट एकसह कंपनी प्रतिनिधींनी काही दुकानांवर छापे टाकले.
यावेळी पोलिसांनी लाखो रुपयांची बनावट ॲक्सेसरीज जप्त केली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. कारवाईत बनावट ॲडेप्टर, हेडफोन, बॅकप्लग, यूएसबी वायर, चार्जर डिव्हाईस, ब्लूटूथ असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ॲपल या नामांकित कंपनीचे बनावट ॲक्सेसरीजही एम.जी.रोडवरील काही मोबाईल ॲक्सेसरीज विक्रेत्यांकडे विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती या कंपनीच्या मार्केटिंग विभागाला मिळाली होती.
ॲपल कंपनीच्या ॲक्सेसरीज महागड्या असून, त्या फक्त त्याच कंपनीच्या डिलरकडे उपलब्ध असतात. असे असताना सदरील कंपनीच्या बनावट ॲक्ेसरीज कमी किंमतीत या विक्रेत्यांकडून विक्री होत असल्याने कंपनीच्या संबंधित विभागाने याबाबत खातरजमा केली. यासंदर्भात शहर पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने एम.जी. रोडवरील प्रधान पार्कमधील काही मोबाईल ॲक्सेसरीज विक्रेत्यांवर काल छापे टाकले.
Copyright ©2024 Bhramar