लोकसभा निवडणूक : किती मतांनी निवडून येणार ?; नारायण राणेंनी सांगितला आकडा
लोकसभा निवडणूक : किती मतांनी निवडून येणार ?; नारायण राणेंनी सांगितला आकडा
img
Dipali Ghadwaje
रत्नागिरी : महायुतीचा उमेदवार म्हणून भाजपने मला संधी दिली. भारत विकसित राष्ट्र, आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी विजयाची हॅट्‌ट्रिक करणार आहेत व ४०० पेक्षा जास्त जागा जिंकायच्या आहेत. यात रत्नागिरी-सिंधुदुर्गचा खासदार असावा यासाठी मला निवडून द्या. किमान अडीच लाखांनी विजय मिळवायचा आहे, असे प्रतिपादन महायुतीचे उमेवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

मारुती मंदिर येथून रॅलीला सुरुवात झाली. ढोलताशांचा गजर, भगवे झेंडे व महायुतीतील सर्वांचे झेंडे फडकत होते. मोटारीत मंत्री नारायण राणे यांच्यासह मान्यवर नेतेमंडळी सहभागी होती. ते अभिवादन करत होते. दुपारच्या कडक उन्हातही महायुतीच्या कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहायला मिळाला. 

जयस्तंभ येथे एका सजवलेल्या कंटेनरवर छोटेखानी सभा झाली. त्यावेळी राणे म्हणाले, ‘‘आम्ही सावलीत आहोत व सर्व कार्यकर्ते उन्हात आहेत. तुम्ही दोन किलोमीटर चालत आलात, हे तुमचे प्रेम, पक्षनिष्ठा. मला असे कार्यकर्ते मिळाल्याबद्दल आभार मानतो. कार्यकर्त्यांना जास्त वेळ उन्हात ठेवणे योग्य वाटत नाही. आज देवेंद्र फडणवीस येणार होते; परंतु नागपूरला मतदान असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत.’’ त्यानंतर राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला.

राणे म्हणाले, ‘‘आज हजारो कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी मला पाठिंबा, शुभेच्छा दिल्याबद्दल आभारी आहे. भाजपने उमेदवारी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आभारी आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी आज अखेरच्या दिवशी दुपारी दीडच्या सुमारास राणे यांनी उमेदवारी अर्ज भरला. काल दुपारी राणे यांचे नाव जाहीर झाल्यानंतर शक्तिप्रदर्शनाची तयारी करण्यात आली. किरण सामंत आज राणे यांच्यासोबतच होते.

यासह गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, पालकमंत्री उदय सामंत, मंत्री दीपक केसकर, मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार शेखर निकम, आमदार नीतेश राणे, माजी आमदार नीलेश राणे, राजन तेली यांच्यासह भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक समन्वयक अजित यशवंतराव, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, माजी आमदार सूर्यकांत दळवी, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे, आरपीआय (आठवले गट), रासप, रयत क्रांती या पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group