Nashik : वधूकडील नातेवाईकांनी केली भावी नवरदेवाची पाच लाखांची फसवणूक
Nashik : वधूकडील नातेवाईकांनी केली भावी नवरदेवाची पाच लाखांची फसवणूक
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- सरकारी नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून वधूकडील दोघा नातेवाईकांनी भावी नवरदेवाची पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याची बाब उघडकीस आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी ललिता मथियस एक्का (रा. ललिता निवास, अयोध्यानगरी, अमृतधाम) यांचा मुलगा रोहित याचा विवाह ठरला असून, मुलीकडील नातेवाईक फिर्यादी एक्का यांचे घर पाहण्यासाठी आले होते. त्यावेळी आरोपी विजय बाबूराव काकडे व सॅम्युएल विजय काकडे (दोघेही रा. झोपडी कॅन्टीन, मकासरे व्यायामशाळेजवळ, सावेडी, ता. जि. अहमदनगर) हे दोघे जण मुलीच्या नातेवाईकांसोबत मुलाचे घर पाहण्यासाठी आले होते. त्यावेळी काकडे यांनी भावी नवरदेव रोहित याला गाठले. 

रोहित हा सुशिक्षित बेरोजगार असल्याने त्याला एमएसईबी किंवा पोस्ट खात्यामध्ये नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून त्याची दिशाभूल केली. दि. 6 डिसेंबर 2019 रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास काकड द्वयींनी रोहित एक्का यांच्याकडून तीन लाख रुपये व फिर्यादी ललिता एक्का यांच्या पतीच्या बँकेच्या खात्यातून दोन लाख रुपये आरोपी विजय काकडे याच्या बँक खात्यामध्ये पाठविण्यासाठी भाग पाडले; मात्र बरेच दिवस उलटूनही मुलाला नोकरी लागली नाही. त्यामुळे फिर्यादी एक्का यांनी आरोपी काकडे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली, तसेच पैसे परत करण्यास टाळाटाळ केली. 


यावरून आपली आर्थिक फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर एक्का यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात विजय काकडे व सॅम्युएल काकडे या दोघांविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देवरे करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group