उद्या (रविवार, ९ जून) देशात नव्या सरकारचा स्थापना होणार असून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या सोबतच उद्याच्या शपथविधी सोहळ्यात राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेलही कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवलेल्या एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा उद्या पार पडणार आहे. राज्यामध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या वाट्याला प्रत्येकी एक मंत्रीपद आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केंद्रिय मंत्रीपदासाठी प्रफुल पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांच्या पार पडलेल्या बैठकीत प्रफुल पटेल यांच्या नावावर राष्ट्रवादीकडून शिक्कमोर्तब करण्यात आले आहे. उद्याच्या शपथविधी सोहळ्यात प्रफुल पटेल हे कॅबिनेट दर्जाच्या मंत्रीपदाची शपथ घेतील. त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाकडूनही एक नेता मंत्रीपदाची शपथ घेईल.
शिवसेना शिंदे गटाकडून खासदार धैर्यशिल माने, श्रीरंग बारणे, प्रतापराव जाधव आदी नेत्यांची नावे मंत्रीपदासाठी चर्चेत आहेत. तर भाजपकडून नारायण राणे, रक्षा खडसे यांची नावे मंत्रीपदासाठी चर्चेत आहेत. त्यामुळे यापैकी केंद्रात कुणाची वर्णी लागणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.