दोन समाजांत तेढ निर्माण करणारी पत्रके वाटल्याने तणाव, पोलीस तपासात हे कारण आले समोर
दोन समाजांत तेढ निर्माण करणारी पत्रके वाटल्याने तणाव, पोलीस तपासात हे कारण आले समोर
img
Dipali Ghadwaje
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- हिंदू युवा समितीच्या नावाने दलित समाजविरोधी पत्रक तयार करून ते राजवाडा परिसरात फेकल्याने शहरातील वातावरण तप्त झाले असून, हा प्रकार पंचवटीत घडला असल्यामुळे दिंडोरी नाका परिसरात समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येऊन रास्ता रोको करण्यात आले. त्यावेळी या परिसरातील वाहतूक यंत्रणा ठप्प झाली होती. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने हा विषय शमला.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन जणांना ताब्यात घेतले आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की हिंदू युवा समितीच्या नावाने दलित समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य असलेले पत्रक राजवाडा परिसरात फेकून देण्यात आले. या पत्रकावरून परिसरात तणाव निर्माण झाला.

दरम्यान, या प्रकरणानंतर सर्व दलित समाज रस्त्यावर उतरला असून, दिंडोरी नाका आणि निमाणी बस स्टँड परिसरात झेंडे व फलकबाजी करून आंदोलन करण्यात आले; मात्र वैयक्तिक वादातून संबंधिताला अद्दल घडविण्यासाठी हा प्रकार केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. या युवकाला इजा पोहोचावी, त्याला त्रास व्हावा, म्हणून हा प्रकार करण्यात आल्याचे समोर आले आहे.

या पत्रकावर एका व्यक्तीचा फोटो व नाव प्रसिद्ध करण्यात आले होते; मात्र फोटोमधील व्यक्तीचा काहीही संबंध नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणातील मुख्य आरोपीने तयार केलेल्या पत्रकामधून दोन समाजांत जातीय तेढ निर्माण करण्याचा उद्देश नसून, वैयक्तिक वादातून या पत्रकावर छापण्यात आलेल्या फोटोमधील इसमाला त्रास व्हावा, याच उद्देशाने पत्रके तयार करून टाकण्यात आली होती. नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी केले आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group