मारहाणीच्या गुन्ह्यात साक्ष देण्यासाठी रत्नागिरी येथील न्यायालयात आलेल्या साक्षीदारावर त्याच गुन्ह्यातील संशयित आरोपीने कोयत्याने पाठीत वार केला. न्यायालयाच्या आवारातच ही घटना घडल्याने वकिलांसह पक्षकारांमध्ये घबराट निर्माण झाली. या हल्ल्यात साक्षीदार जखमी झाले असून, त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.योगेश चाळके यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी स्वरूप राऊत याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नेमक प्रकरण काय ?
ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीत सन 2023 मध्ये मारहाणप्रकरणी स्वरूप राऊत याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच गुन्ह्याची सुनावणी रत्नागिरी न्यायालयात सुरू आहे. त्या गुन्ह्यामध्ये योगेश चाळके हे साक्षीदार आहेत. गुरूवारी गुन्ह्याची सुनावणी असल्याने योगेश चाळके (32, टिके चाळकेवाडी) व स्वरूप राऊत (रा. हरचिरी) त्याचे वडील जयसिंग राऊत हे न्यायालयात हजर होते.
साक्ष देऊन योगेश चाळके बाहेर पडत असताना स्वरूप राऊत याने पिशवीतून आणलेला कोयता घेऊन पाठीमागून उजव्या खांद्यावर वार केला. त्यामुळे योगेश चाळके खाली कोसळले. त्यानंतर स्वरूपने पुन्हा कोयता उगारली. परंतु तो हल्ला चुकवताना स्वरूपच्या हातातील कोयतीचे टोक योगेश चाळके यांच्या पाठीत घुसले. यामध्ये ते रक्तबंबाळ झाले.
न्यायालयाच्या आवारातच संशयित आरोपीने साक्षीदारावर कोयत्याने हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी स्वरूप याला ताब्यात घेतले. त्यानंतर जखमी झालेल्या योगेश चाळके यांना जिल्हा शासकीय रूग्णालयात तातडीने दाखल केले. न्यायालयाच्या आवारातच हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली. याप्रकरणी योगेश चाळके यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी स्वरूप राऊत याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.