पुण्यातील कल्याणीनगर भागातील पोर्शे कार अपघात प्रकरण चर्चेत असताना आता कल्याणमध्ये तशीच काहीशी पुनरावृत्ती झाल्याची घटना घडली आहे. अल्पवयीन मुलाने कार चालवताना दुसऱ्या चारचाकीला धडक दिली आहे.
अल्पवयीन मुलाने चार चाकीला धडक दिल्याची ही घटना घडली, तर कारला धडक दिल्यानंतर अल्पवयीन मुलाने मित्रांना बोलावून कारचालकाला बेदम मारहाण केली. याशिवाय, गाडीची तोडफोड देखील केली आहे.
अल्पवयीन मुलाची चारचाकीला धडक
अल्पवयीन मुलाच्या वडिलांचे नाव राजाराम चौधरी असल्याचं समोर आलं आहे. कल्याण जवळील आटाळी परिसरात ही घटना घडली आहे. खडकपाडा पोलिसांनी अल्पवयीन मुलासह त्याच्या वडिलांच्या विरोधात कल्याण खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यानंतर आता कल्याण ?
पुण्यामध्ये अल्पवयीन मुलाने अपघात केल्याची घटना ताजी असताना कल्याणमध्ये अल्पवयीन मुलाने अपघात केल्याने पुन्हा कार अपघाताची चर्चा रंगली आहे. कल्याण अटाळी गावात शुक्रवारी मध्यरात्री अल्पवयीन मुलगा ब्रिझा कार घेऊन कल्याणवरून अटाळी येथे असलेल्या आपल्या घरी जात असताना अटाळी चौकात रस्त्याचा अंदाज न आल्याने समोरून येणाऱ्या किया कारला अल्पवयीन मुलाने धडक दिली, या धडकेनंतर वाद निर्माण झाला.