एकाच व्यक्तीचे दोन वेगवेगळे मृत्यू दाखले तयार करून विमा कंपनीची फसवणूक करत मिरा भाईंदरमध्ये 70 लाखांचा चुना लावल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भाईंदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यात अजून एकालाही अटक करण्यात आली नसून चार जणांचा शोध सुरु आहे.आरोपींमध्ये एक डॉक्टराचाही समावेश आहे.
भाईंदर पश्चिमेला रहाणाऱ्या एका कुटुंबाने डॉक्टरच्या मदतीने विविध इन्शुरन्स कंपन्यांची बनावट कागदपत्रे बनवून 69 लाख 60 हजाराची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चार जणांवर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केली बनावट कागदपत्र तयार
भाईंदर पश्चिमेच्या प्रभातनगर, राई गाव येथे राहणाऱ्या कांचन ऊर्फ पवित्रा रोहीत पै, रोहित पै, धनराज पै आणि डॉ. आशुतोष यादव यांनी मिळून बनावट कागदपत्रे तयार केली. आरोपी त्या कागदपत्रांच्या आधारे इन्शुरन्स कंपन्यांकडून क्लेम मिळवायचे, टर्म इन्शुरन्स काढायचे आणि त्यानंतर मयत दाखवून त्याचे बनावट कागदपत्रे बनवून इन्शुरन्स कंपनीला सादर करायचे.
लाखोंची फसवणूक
आरोपींनी सहा कंपन्यांचे इन्शुरन्स काढले होते. त्यातील 4 इन्शुरन्स कंपनीचा क्लेमदेखील मिळवला. इन्शुरन्स क्लेम मिळाल्यानंतर ते घर सोडून दुसरीकडे रहायला जायचे. तेथे रहायला गेल्यानंतर त्या पत्त्यावर पुन्हा त्याच व्यक्तीचा टर्म इन्शुरन्स काढायचे.
या प्रकारेआरोपींनी आयसीआयसीआय कंपनी, मॅक्स लाईफ कंपनी, भारती एक्सा, फ्युचर जनरल, एचडीएफसी इन्शुरंस अशा सहा इन्शुरन्स कंपन्याच्या पॉलिसी काढल्या होत्या. त्यातील चार कंपन्यांकडून 1,10,58,750 रुपयांचा क्लेम केला. क्लेम केल्यानंतर त्या रकमेपैकी 69 लाख 60 हजार रुपयांची क्लेमची रक्कम मिळवली. याप्रकरणी 4 जणांवर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजून एकालाही अटक करण्यात आली नसून चौघांचाही शोध सुरु आहे.