विंचुरला पहाटे स्टेट बँकेचे एटीएम फोडले; चोरट्यांचा शोध सुरू
विंचुरला पहाटे स्टेट बँकेचे एटीएम फोडले; चोरट्यांचा शोध सुरू
img
दैनिक भ्रमर
लासलगाव (शेखर देसाई) :- विंचूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नाशिक ते येवला हमरस्त्यावर एटीएम मध्ये स्विफ्ट गाडीतून आलेल्या दोन पेक्षा अधिक अज्ञात चोरांनी गॅस कटरने एटीएम खोलून त्यातील रोख रक्कम चोरून काही लाखांची रक्कम लुटून नेल्याने खळबळ उडाली आहे.

या लुटी नंतर काही तासातच शिरपूर येथे अशी घटना घडली असून स्टेट बँकेचे एटीएम याच पद्धतीने फोडण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे याच टोळीने तेथेही हात मारला असावा असा अंदाज आहे.

 या गाडीतून दोन पेक्षा अधिक लोक आले असावेत असा अंदाज पोलिसांनी वर्तवला. रात्री दीड वाजेच्या सुमारास या चोरट्यांनी या एटीएम मध्ये प्रवेश करण्यापूर्वी कॅमेऱ्यावर स्प्रे मारला आणि एटीएम मधील सर्व रक्कम घेऊन ते फरार झाले. एटीएम मधील छेडखानी नंतर लासलगाव पोलीस कार्यालयास संगणीकृत मेसेज आल्यानंतर तातडीने लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व पथक पाच ते दहा मिनिटांमध्ये घटनास्थळी दाखल झाले.

तोपर्यंत चोरटे फार झाले होते. या लुटीत अद्याप किती रक्कम लुटली याचा अधिकृत अंदाज फिर्याद दाखल न झाल्याने समजलेला नाही. तरी काल सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास या एटीएम मध्ये सुमारे 33 लाख रुपयांची रक्कम भरण्यात आलेली होती अशी अनधिकृत माहिती हाती येत आहे.

या घटनेची माहिती समजतात लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे, हवालदार सुजय बारगळ, हवालदार घुमरे, हवालदार निचळ, हवालदार निकम, हवालदार डोंगरे, चालक देशमुख यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी तेथे धाव घेतली आणि कारच्या दिशेने लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांनी पाठलाग सुरू केला.

पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, निफाडचे पोलीस उपाधीक्षक डॉ. निलेश पालवे हे देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आज सकाळी फिंगरप्रिंट तज्ञ व पोलीस निरीक्षक जोशी हे देखील घटनास्थळी दाखल झाले. या सर्वांनी तपासणी केली असता सदर श्वान पथक हे फक्त रस्त्यापर्यंत जाऊ शकले अशी माहिती समजते.

याबाबत लासलगाव पोलिसांनी ठिकठिकाणी पथके रवाना केली असून अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी देखील विंचूर येथे भेट देऊन तपासासाठी मार्गदर्शन केले. अद्याप स्टेट बँकेच्या वतीने लासलगाव पोलीस कार्यालयात अधिकृत  फिर्याद दाखल झालेली नाही ती दाखल झाल्यानंतर नेमकी लूट किती झाली असावी याबाबतचा अधिकृत तपशील हाती येणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group