Nashik : 2 कोटींचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून तरुणाला 1 कोटी रुपयांना गंडा
Nashik : 2 कोटींचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून तरुणाला 1 कोटी रुपयांना गंडा
img
दैनिक भ्रमर

नाशिक (प्रतिनिधी) :- 2 कोटीचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यासाठी विविध प्रोसेससाठी वेळोवेळी पैसे घेऊन एका तरूणाची 12 जणांनी सुमारे 1 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी रोशन सुनिल तांदळे (वय 35, रा. लोटस सृष्टी अपार्टमेंट, केवलपार्क रोड, अंबड) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. संशयित आरोपी मनोज चंद्रकांत गांगुर्डे (वय 46, रा. अश्विननगर, नाशिक), सागर कऱ्हाड (वय 40, रा. भन्साळी मळा, मखमलाबाद रोड, पंचवटी), महेश प्रभूराम शिंदे (वय 35, भिवंडी, जि. ठाणे), राघवेंद्र उर्फ विक्रांत किराड (वय 45), अविनाश यादव (मोहम्मद अली शेख) (वय 36, रा. मालाड, मुंबई), सिद्धांत राजपूत (वय 38), निलेश तोंडलेकर (वय 45) व अनोळखी 5 इसम यांनी संगनमत करुन फिर्यादी रोशन तांदळे यांच्याशी संपर्क साधला.

तांदळे हे कर्ज मिळविण्याच्या प्रयत्नात होते. त्यावेळी या सर्व आरोपींनी त्यांचा विश्वास संपादन करुन ग्लोबल फायनान्स कंपनीची स्किम समजावून सांगितली. या कंपनीत 1 कोटी रुपयांची रक्कम जमा केली तर कंपनी तुम्हाला 2 कोटींचे कर्ज देईल. तसेच 2 कोटीच्या कर्जापैकी 1 कोटीची रक्कम ग्लोबल फायनान्स कंपनीतर्फे तुमच्या कंपनीत गुंतवणूक करुन झालेला नफा-तोटा यात 50 टक्के हिस्सा राहिल. तसेच उर्वरीत 1 कोटी रुपयांची रक्कम 7 वर्षांत ग्लोबल फायनान्स कंपनीला बिनव्याजी परत करावी लागेल, असे आमिष दाखवले.

त्यानंतर वरील आरोपींनी 2 कोटी रुपयांचा  बनावट डी.डी. फिर्यादी तांदळे यांना देऊन 1 कोटी रुपयांची रोख रक्कम व कंपनीचे स्लॉट बुकींग चार्जेस म्हणून 3 लाख 75 हजार अशी एकूण 1 कोटी 3 लाख 75 हजार रुपयांची रोख रक्कम तांदळे यांच्याकडून या आरोपींनी स्वीकारली. मात्र ऐवढी मोठी रक्कम घेऊनही कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळवून न देता आरोपींनी त्यांची आर्थिक फसवणूक केली. याबाबत तांदळे यांनी आरोपींकडे पैशाची मागणी व कर्जाविषयी चौकशी केली असता त्यांना उडवा उडवीची उत्तरे देऊन पैसे देण्यास टाळाटाळ केली. हा प्रकार 8 जून ते 2 ऑगस्ट 2023 या कालावधीत अंबड एमआयडीसीत घडला. 

यात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रोशन तांदळे यांनी अंबड पोलीस ठाण्यात 12 संशयितांविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुघले करीत आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group