नाशिक :- वस्तुसमोर दाखवलेल्या डिस्काउंट पेक्षा प्रत्यक्ष बिलात जास्त रक्कम लावलेल्याचा प्रकार आज कॉलेजरोडवरील स्मार्ट बझार येथे घडला.
याबाबत अधिक माहिती अशी की, एक ग्राहक आज खरेदीसाठी कॉलेजरोडवरील स्मार्ट बझार येथे गेला होता. वस्तू खरेदी करताना त्यासमोर संबंधित वस्तूंचे डिस्काउंटेड दर लावलेले होते. त्यानुसार त्याने खरेदी केली.
बिलिंगच्या वेळी कॅशिअरने मागितलेले पैसे त्याने दिले. नंतर त्याने बिलावर नजर मारली असता, त्याला काही वस्तूंच्या दराबाबत शंका आली. त्याने चिंग सॉस घेतला होता, त्यावर 103 रुपये दर असलेले लेबल लावलेले होते, प्रत्यक्षात मात्र त्याच्या बिलात 135 रुपये लावण्यात आले होते. तसेच एक बिस्किटाचा पुडा त्याने घेतला तेव्हा त्यासमोर 95 रुपये दराचे लेबल होते, प्रत्यक्षात मात्र त्याच्या बिलात 110 रुपये लावले.
त्याने याबाबत संबंधितांना विचारले असता त्यांनी आधी खात्री केली नंतर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मग त्यांनी रोख रक्कम न देता क्रेडिट नोट घेऊन इतर वस्तू घेण्यास सांगितले. ग्राहकाने नकार दिला असता त्याला उर्वरित रक्कम 47 रुपये त्यांनी अदा केली. दिवसभरात असे किती ग्राहकांबाबत होत असेल असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
अनेक ग्राहक मॉल मधील विविध स्कीमला बळी पडतात. तिथे खरेदीसाठी झुंबड उडते. प्रत्येकाने आपले बिल भरल्यानंतर खात्री करून घ्यायला हवी की बिलात लावलेली रक्कम बरोबर आहे की नाही. मात्र, अनेक जण काहीच न बघता निघून जातात याचाच फायदा हे मॉलवाल्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष होतो.