२ ऑगस्ट २०२४
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून मोठ्या प्रमाणात नफा कमावण्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी एका इसमाची सुमारे सव्वा कोटी रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी व त्यांचे इतर साक्षीदार हे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून त्यातून नफा मिळविण्याचा प्रयत्न करीत होते. त्यादरम्यान फिर्यादीसह त्यांचे साक्षीदार हे ऑनलाईन सर्च करीत होते. त्यावेळी त्यांनी शेअर मार्केटसंदर्भातील वेगवेगळ्या वेबसाईटवर शोध घेत होते. त्यादरम्यान मार्च ते जुलै 2024 या कालावधीत टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, फेसबुक व इतर वेगवेगळ्या समाजमाध्यमांवरील संशयित वेगवेगळ्या प्रोफाईल-धारकांनी फिर्यादी इसम व त्याच्या इतर साक्षीदारांशी ऑनलाईन संपर्क साधला.
त्यानंतर संशयितांनी फिर्यादी व साक्षीदार यांना शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून मोठ्या प्रमाणात नफा कमावण्याचे आमिष दाखविले. संशयितांनी त्यांचा विश्वास संपादन करून फिर्यादी व त्याच्या साक्षीदारांना वेगवेगळ्या बहाण्यांनी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वेळोवेळी पैसे भरावयास सांगितले. त्यावर विश्वास ठेवून फिर्यादीसह साक्षीदारांनी वेळोवेळी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये 1 कोटी 21 लाख 23 हजार 397 रुपये भरावयास लावून फसवणूक केली. ही बाब लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी सायबर पोलीस ठाण्यात संशयित प्रोफाईलधारकांविरुद्ध फसवणुकीची फिर्यादी दिली असून, याबाबत पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.
Copyright ©2025 Bhramar