गोदावरीला यंदाचा पहिला पूर; दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी
गोदावरीला यंदाचा पहिला पूर; दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी
img
Mukund Baviskar
 नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : नाशिक शहर व परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आज गोदावरी नदीला या पावसाळ्यातील पहिला पूर आला असून दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आले आहे.

शहरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरूच असून जिल्ह्यातही अनेक भागात पाऊस सुरूच आहे. दरम्यान जिल्ह्यातील धरण साठ्यामध्ये मोठी वाढ झाल्याची दिसून येते. गंगापूर धरण ८५ टक्के, मुकणे ५० टक्के, दारणा ९० वालदेवी ९८ टक्के, काश्यपि ४७ टक्के, गौतमी गोदावरी ८४ टक्के, पालखेड ७८ टक्के, वाघाड ६० टक्के भरले आहे.

संततधार पावसामुळे नाशिकच्या गोदा घाटावर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. रामकुंडावरील अनेक छोटी-मोठी मंदिरे पाण्याखाली गेल्याचे दिसत आहे.

प्रशासनाकडून गोदाकाठ परिसरातील दुकाने हटविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा, दिंडोरी या तालुक्यांत दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. यामुळे धरणांच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. दारणा, नांदूरमध्यमेश्वर, कडवातून विसर्ग सुरू झाला आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जोरदार पावसामुळे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ८५ टक्के जलसाठा झाला आहे. चार ते पाच तालुक्यांत पावसाने जोर घेतल्याने धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. भावली धरण तुडुंब भरले आहे. काल दिवसभर पाऊस सुरुच होता. पावसाची संततधार असली तरी कुठलाही मोठी दुर्घटना झाली नाही. मात्र काही ठिकाणी झाडे आणि झाडांच्या फांद्या रस्त्याच्या कडेला पडलेल्या दिसून आल्या.

काल सायंकाळी पावसामुळे शहरात वाहतूक कोंडी झाली होती, मात्र आज रविवारची सुट्टी असल्याने सकाळी  शहर आणि परिसरात फारशी रहदारी नव्हती.
इतर बातम्या
Join Whatsapp Group