राज्यात पावसाचं आगमन झालं असून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. तर काही ठिकाणी आता पाऊस विश्रांती घेत असल्याचं दिसून येतंय. दरम्यान अनेक भागांमध्ये येत्या काही तासांत पाऊस हजेरी लावेल. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळेल तर कुठे मध्यम पाऊस पडेल. असा अंदाज हवामान विभागानं वर्तविला आहे .
येत्या 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज असून, शहर आणि उपनगरात मध्यम पाऊस पडेल. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 31°C आणि 26°C च्या आसपास असेल. त्यामुळे येत्या काही तासांमध्ये राजधानी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पाऊस असेल. पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यात हवामान विभागाने जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या भागाला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा राहिल. 30-40 किमी प्रतितास वेगानं हा वारा राहिल. आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान , दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.