काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाणार अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. लोकसभेत फटका बसल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने मोठा निर्णय घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील भाजप उमेदवारांच्या तिकीट वाटपाचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहेत. भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
भाजपा प्रदेश कार्यालयात कोअर कमिटीची बैठक रविवारी पार पडली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र विधानसभा प्रभारी भूपेद्र यादव, सह संघटन मंत्री शिवप्रकाश, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, सरचिटणीस विनोद तावडे, पंकजा मुंडे उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीसंदर्भातील तयारी, आढावा आणि नियोजन या बैठकीत ठरले आहे.
दरम्यान , महायुतीमधील सर्व पक्षांचे आणि नेतृत्वांचे जागा निश्चित करण्याचा निर्णय झाला आहे. आमच्या सर्व मित्र पक्षांसोबत बैठक होतच आहेत. निवडणुका जिंकण्याचे नियोजन आणि त्यासोबत जागावाटप हा कार्यक्रम सुद्धा ठरला आहे. हे संपूर्ण देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू करण्याचे पक्षाने स्पष्ट केला आहे.