नवीन नाशिक - शहरामध्ये गाड्यांची जाळपोळ करण्याचे प्रकार सुरू असून आज सकाळी सिडकोतील ़शंभूराजे नगरमध्ये समाजकंटकांनी दुचाकी जाळून टाकल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने अंबड पोलिसांचे पथक या ठिकाणी दाखल झाले असून पुढील तपास सुरू केला आहे.
नाशिक शहरामध्ये सातत्याने गाड्यांची तोडफोड किंवा गाड्यांना आग लावण्याची घटना सुरू आहेत. गणेशोत्सवाच्या काळात गणपती बसल्यानंतर दुसर्या दिवशी गाड्यांची तोडफोड करण्याची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा सिडको परिसरामध्ये गाडी पेटवून देण्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या खुटवडनगर परिसरातील शंभूराजेनगर येथील अजिंक्य व्हिलेज परिसरात सोसायटीच्या खाली उभी करण्यात आलेली दुचाकी सकाळी आठ वाजेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी पेट्रोल टाकून जाळली. सकाळी मॉर्निंग वॉकला जाणार्या नागरिकांना हा प्रकार लक्षात आला. या लोकांनी गाडीला लागलेली आग तातडीने विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यामुळे काही वेळाने या गाडीला लागलेली आग विझली.