सीबीआयमधून बोलत असल्याचे भासवून दाम्पत्यासह तिघांना दीड कोटीचा ऑनलाईन गंडा
सीबीआयमधून बोलत असल्याचे भासवून दाम्पत्यासह तिघांना दीड कोटीचा ऑनलाईन गंडा
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- सीबीआयमधून बोलत असल्याचे भासवून मनी लाँडरिंग केसमधून सुटका पाहिजे असेल, तर बँक खात्यात रक्कम जमा करा, असे सांगून एका दाम्पत्यास अज्ञात इसमाने सुमारे दीड कोटी रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत सायबर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी हे दि. 15 जुलै 2024 रोजी घरी होते. त्यावेळी वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून बोलणार्‍या व चॅटिंग करणार्‍या राकेश शिंदे नावाच्या इसमाने आपण सीबीआयमधून बोलत असल्याचे भासविले. त्यानंतर फिर्यादी व त्यांच्या पत्नीचा मोबाईल क्रमांक हा मनी लाँडरिंग प्रकरणात संशयित म्हणून आढळला असल्याचा बहाणा केला.

त्यानंतर संबंधित इसमाने या प्रकरणातून तुम्हाला जर सुटका करून घ्यायची असेल, तर तुमच्या बँक खात्यामध्ये जमा असलेली रक्कम ही आम्ही सांगितल्याप्रमाणे बँक खात्यात वर्ग करण्यास सांगितले. त्यानुसार 1 कोटी 30 लाख रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर साक्षीदार हितेश राजेंद्र महाले यांना अन्य दुसर्‍या एका मोबाईल क्रमांकावरून अज्ञात व्यक्तीने फोन करून फेडेक्स कर्मचारी असल्याचे सांगितले, तसेच गैरकानुनी पार्सल तुमच्याकडे येत आहे, असे दाखवून स्काईप आयडीवरील व्यक्तीने महाले यांना अज्ञात व्यक्तीने मुंबई पोलिसांतून बोलत असल्याचे सांगून साक्षीदार हितेश महाले यांना दबावात आणून त्यांची एकूण 5 लाख 18 हजार 998, तसेच दुसरी साक्षीदार दीपाली सागर मंडलिक यांना अन्य एका मोबाईल क्रमांकावरून फोन आला.

फोनवरून बोलणार्‍या अज्ञात इसमाने मुंबई सायबर क्राईम ब्रँचमधून बोलत असल्याचे भासविले. त्यानंतर त्या अज्ञात इसमाने मंडलिक यांना त्याने सांगितलेल्या बँक खात्यावर 6 कोटी 9 लाख 81 रुपये भरण्यास भाग पाडून त्यांची आर्थिक फसवणूक केली. याप्रमाणे अज्ञात इसमाने फिर्यादीसह हितेश महाले, दीपाली मंडलिक या तिघांना एकूण 1 कोटी 42 लाख 9 हजार 79 रुपयांना गंडा घातला. हा प्रकार दि. 15 जुलै ते 5 ऑगस्ट 2024 दरम्यान इंटरनेट व फोनद्वारे घडला. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरुद्ध ऑनलाईन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group