‘गो गो गो गोविंदा… गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा…’ असा जयघोष सध्या मुंबईसह संपूर्ण ठाणे, नवी मुंबई आणि पुण्यात पाहायला मिळत आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई, ठाण्यात लाखो रुपयांचे पारितोषिक असलेल्या उंचच उंच दहीहंडी बांधण्यात आल्या आहेत. तर त्यांना फोडण्यासाठी दहीहंडी पथकांमध्ये चुरस रंगणार आहे.
मुंबईत जल्लोषात दहीहंडीचा उत्साह सुरु असताना दुसरीकडे थरावरुन कोसळल्याने काही गोविंदा जखमी झाले आहेत. त्यामुळे दहीहंडी सणाला गालबोट लागले आहे. मुंबईत आतापर्यंत 15 गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत दुपारी 12 वाजेपर्यंत विविध पथकातील 15 गोविंदा जखमी झाले आहे. या सर्व गोविंदांवर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात मुंबईतील केईएम रुग्णालयात 1, नायर रुग्णालयात 4, सायन रुग्णालयात 2, सेंट जॉर्ज हॉस्पिटलध्ये 1, पोद्दारमध्ये 4, राजावाडीमध्ये 1, एमटी अगरवार रुग्णालयात 1 आणि कुर्ला भाभा रुग्णालयात एका रुग्णावर उपचार सुरु आहेत.
या सर्व जखमी गोविंदांवर ओपीडीमध्ये उपचार सुरू आहेत. सुदैवाने यातील कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. सध्या या सर्व गोविंदांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.
दरवर्षी दहीहंडी फोडताना मोठ्या प्रमाणात गोविंदा जखमी होतात. या गोविंदांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी मुंबईतील राज्य सरकारबरोबरच महानगरपालिकेची रुग्णालये सज्ज ठेवण्यात आली आहेत.