खा. श्रीकांत शिंदे शुक्रवारी नाशिक जिल्हा दौऱ्यावर;
खा. श्रीकांत शिंदे शुक्रवारी नाशिक जिल्हा दौऱ्यावर; "असा" आहे कार्यक्रम
img
दैनिक भ्रमर
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते युवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे उत्तर महाराष्ट्राचा जन संवाद दौरा करणार आहेत. गुरुवार २९, ऑगस्ट ते शनिवार, ३१ ऑगस्ट २०२४ दरम्यान होणाऱ्या या दौऱ्यात खासदार डॉ. शिंदे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींशी संवाद साधणार असून  विधानसभेच्या ३३ मतदार संघांचा आढावा घेणार आहेत. 

शिवसेनेला लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले होते. शिवसेनेचे ७ खासदार निवडून आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम करत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीवर शिवसेना पक्षाने लक्ष केंद्रीत केले आहे. उत्तर महाराष्ट्रातील तरुण कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी संवाद साधून पक्ष संघटन बळकट करण्यावर भर देण्यात येणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या दौऱ्याची उत्तर महाराष्ट्रातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. 

जन संवाद दौऱ्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उत्तर महाराष्ट्रातील ३३ विधानसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहेत. उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये नांदगाव मतदार संघात शिवसेनेचे सुहास कांदे आमदार आहेत. मालेगाव बाह्य मतदार संघात मंत्री दादा भुसे आमदार आहेत. जळगाव ग्रामीणमध्ये मंत्री गुलाबराव पाटील आमदार आहेत. चोपडा मतदार संघात शिवसेनेच्या लता सोनावणे आमदार आहेत. एरंडोल मतदार संघात शिवसेनेचे चिमणराव पाटील आमदार असून पाचोरा विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे किशोर पाटील आमदार आहेत. 

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या जन संवाद दौऱ्याची सुरुवात जळगाव जिल्ह्यातून होणार आहे. २९ ऑगस्ट रोजी जळगाव येथे सकाळी १० वाजता खासदार डॉ. शिंदे मुक्ताईनगर मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. सकाळी ११ वाजता एरंडोल-पारोळा, दुपारी १२ वाजता चोपडा आणि दुपारी १ वाजता पाचोरा भडगाव मतदार संघाचा आढावा बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर धुळे येथे संध्याकाळी ४ वाजता अक्कलकुवा मतदार संघ, संध्याकाळी ५ वाजता साक्री आणि संध्याकाळी ६ वाजता धुळे शहर मतदार संघाची आढावा बैठक आणि पदाधिकाऱ्यांशी खासदार डॉ. शिंदे संवाद साधतील. 

जन संवाद दौऱ्यात दुसऱ्या दिवशी ३० ऑगस्ट २०२४ रोजी नाशिक येथे सकाळी १० वाजता देवळाली विधानसभा, सकाळी ११ वाजता दिंडोरी पेठ, दुपारी १२ वाजता चांदवड-देवळा आणि दुपारी १ वाजता निफाड मतदार संघाची आढावा बैठक घेण्यात येणार आहे. संध्याकाळी ४ वाजता नांदगाव येथे शिवसृष्टी लोकार्पण कार्यक्रमाला खासदार डॉ. शिंदे उपस्थित राहणार आहेत. जन संवाद दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी ३१ ऑगस्ट २०२४ रोजी शिर्डी येथे सकाळी ११ वाजता श्रीरामपूर आणि दुपारी १२ वाजता नेवासा विधानसभा मतदार संघाची आढावा बैठक होईल. त्यानंतर इगतपुरी मतदार संघाची आढावा बैठक संध्याकाळी ४ वाजता पार पडेल, असे शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.    

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात १५ आमदार, अहमदनगर जिल्ह्यात १२ आमदार, नंदुरबार जिल्ह्यात ४ आमदार, धुळे जिल्ह्यात ५ आमदार, जळगाव जिल्ह्यात ११ आमदार असे एकूण ४७ आमदार आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group