लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वच नेते, पदाधिकारी मतदारसंघांची चाचपणी करत आहे. तसेच महायुती आणि महाविकासआघाडीत विधानसभेच्या जागावाटपाची चर्चा सुरु आहे. त्यातच आता भाजप नेते आणि माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी मोठं वक्तव्य केले.
जालना लोकसभा मतदारसंघात भाजपाचे रावसाहेब दानवे हे सलग पाच वेळा निवडून आले होते. यंदाच्या निवडणुकीत रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध कॉग्रेसचे डॉ.कल्याण काळे हे मैदानात उतरले. या मतदारसंघावर दानवेंची मजबूत पकड समजली जात होती. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांना अटीतटीची लढत दिली होती. त्या निवडणुकीत दानवे यांनी काळे यांचा 8 हजारापेक्षा अधिक मतांनी पराभव केला होता. आता यंदाच्या निवडणुकीत रावसाहेब दानवे यांना पराभवाचा सामना करावा लागला.
रावसाहेब दानवे यांचा एक लाख मतांच्या फरकाने पराभव झाला. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनाचा प्रभाव जालन्याच्या निवडणुकीवर दिसून आला. यानंतर आता रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या पराभवाची कारणं सांगितली आहेत. माझ्या मुलाच्या मतदारसंघातदेखील मला कमी लीड मिळाले, मग मी आता त्याचाही बदला घेऊ का, असा सवाल रावसाहेब दानवे यांनी विचारला.
रावसाहेब दानवे नेमकं काय म्हणाले?
“माझा पराभव हा एखाद्या व्यक्तीमुळे झालेला नाही. माझ्या मुलाच्या मतदारसंघातही मला लीड मिळाली नाही. मग त्यात माझ्या मुलाने काम केलं नाही असं मी म्हणू का? किंवा मी आता त्याचाही बदला घेऊ का?” असे रावसाहेब दानवे म्हणाले. “माझा पराभव जनमतामुळे झाला आहे. त्यामुळे यात कोणालाही दोष देता येणार नाही”, असे रावसाहेब दानवेंनी म्हटले. “राज्याच्या राजकीय वातावरणात अचानक बदल झाला आणि त्याचा फटका पक्षाला बसला”, असे दानवे म्हणाले.