२० ऑक्टोबर २०२३
नाशिक (प्रतिनिधी) :- जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या भरारी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दिंडोरी-पेठ लिंक रोडवरील साई मंदिराजवळ कार क्र. एमएच15 एए 2842 मधून तब्बल 40 लाख 50 हजार रुपये किमतीचा बनावट कीटकनाशकांचा साठा भरारी पथकाने जप्त केला आहे. या प्रकरणी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक जगन सूर्यवंशी यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात दोघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत माहिती अशी, की दि. 18 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा कृषी अधिकारी गोकुळ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी कैलास शिरसाठ, तंत्र अधिकारी उल्हास ठाकूर, अभिजित घुमरे, राहुल अहिरे, निफाड पंचायत समितीचे कृषी अधिकारी बाळासाहेब खेडकर यांनी पेठ रोडवरील साई मंदिराजवळ बनावट कीटकनाशके विक्री सुरू आहे, असे समजल्यावरून त्या ठिकाणी बोगस गिर्हाईक पाठविले व या बोगस गिर्हाईकांनी आपण परराज्यांतून येणार्या विनापरवाना अवैध व बनावट कीटकनाशकांची खरेदी करतो, असे भासविले. या नाट्यात संशयित ज्ञानेश्वर पंढरीनाथ चित्ते (रा. दिंडोरी) व महेश टर्ले (रा. निफाड) हे अडकले.
या कारवाईमुळे फसवणूक करणार्या टोळीचे धाबे दणाणले आहे. बनावट कृषी निविष्ठा विक्री करणार्यांची माहिती शेतकरी बांधवांनी कृषी विभागाकडे द्यावी, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी केले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास म्हसरूळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पाचोरकर करीत आहेत.
Copyright ©2024 Bhramar