नाशिक (चंद्रशेखर गोसावी) :- पहाटेच्या सुमारास सातपूर औद्योगिक आयटीआय सिग्नलजवळ एका बिल्डिंगच्या दोन मजल्याना भीषण आग लागली या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
आयटीआय सिग्नलजवळ गिते यांच्या मालकीची गिते स्क्वेअर बिल्डिंग आहे. आज पहाटे पावणेचार वाजेच्या सुमारास या बिल्डिंगच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्याला भीषण आग लागली.
बिल्डिंगच्या तळमजल्यावरच राहत असलेल्या वॉचमनने ही घटना त्वरित अग्निशमन दलाला कळविली. या आगीत लॅपटॉप, प्रिंटर, मोबाईल व कॉम्युटरचे स्पेअरपार्ट्स जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ही आग कशामुळे लागली, हे समजू शकले नाही. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे सातपूर विभागीय कार्यालयातील दोन, मुख्य अग्निशमन केंद्रातील एक, सिडको अग्निशमन केंद्रातील एक व विभागीय अग्निशमन केंद्रातून एक असे पाच बंब मागविण्यात आले.
सुमारे तीन तासांनी ही आग विझविण्यात अग्निशमन दलाला यश आले. पहाटेची वेळ असल्याने ऑफिसमध्ये कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. याच बिल्डिंगमधील तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर गिते यांचे ऑफिस आहे. आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर झाल्याने वरील दोन्ही मजल्यांवर ही आग पसरली नाही. सध्या तेथे कुलिंगचे काम सुरू आहे. ही आग विझविण्यासाठी मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी, प्रभारी अग्निशमन अधिकारी प्रदीप परदेशी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.