पुण्यातील दौंडमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका महिलेने चक्क आपल्या पोटच्या दोन चिमुकल्यांचा गळा दाबून हत्या केली. यासोबतच या महिलेने आपल्या पतीवर देखील कोयत्याने वार केलेत. आज पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना समजताच परिसरात एकच खळबळ उडाली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली मधील शिंदे वस्ती मध्ये ही धक्कादायक घटना घडली. दौंड पोलिसांनी 30 वर्षीय आरोपी महिलेला अटक केली आहे.
शंभू दुर्योधन मिढे वय ०१ वर्ष आणि पियू दुर्योधन मिढे वय ०३ वर्ष अशी मयत मुलांची नावे आहेत. या महिलेने तिचा पती दुर्योधन आबासाहेब मिढे वय 35 वर्ष याला देखील कोयत्याने मानेवर व हातावर वार करून जखमी केलं आहे.
दरम्यान पती-पत्नीच्या वादातून आणि सासरच्या जाचाला त्रासून महिलेने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.