नाशिक :- शनिवारी रात्री मद्याच्या नशेत एका तरुणीने पोलिसांशी अरेरावीची भाषा करत त्यांच्याशी हुज्जत घातली होती. या घटनेची दखल पोलिसांनी व प्रशासनाने चांगलीच घेतली आहे.
नाशिकमध्ये अनेक रुफ टॉप हॉटेल्स व कॅफे असून ते रात्री उशिरापर्यंत सुरु असतात अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.
कॉलेजरोड व गंगापुर रोड परिसरात सुरू असलेले हॉटेल्स, कॅफेस, स्पा सेंटर यांनी त्यांच्या शॉपमध्ये अंतर्गत सजावट तसेच महानगरपालिकेकडुन बांधकामासाठी देण्यात आलेल्या परवानगीचे उल्लंघन करून अतिरीक्त बांधकाम केल्याचे तसेच डान्स क्लब सारखी सजावट करून त्यामध्ये तरूण-तरूणींना मद्य पुरवून रात्री उशिरापर्यंत सदर आस्थापना सुरू ठेवुन सार्वजनिक शांततेचा भंग तसेच तरूण पिढीला वाम मार्गास लावण्याचे प्रकार आढळुन येत असल्याने या बाबत वारंवार स्थानिक नागरीकांच्या तक्रारी पोलीस आयुक्त व गंगापुर पोलीस ठाणे येथे येत होत्या.
त्याअनुषंगाने आज दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास गंगापुर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपुत यांनी महानगरपालिकेच्या नगररचना विभागाशी संपर्क करून त्यांचे उपायुक्त मयुर पाटील व महानगरपालिकेचा स्टाफ यांची मदत घेवुन कॉलेजरोड, गंगापुर रोड परिसरातील रूफ टॉफ हॉटेल व कॅफे त्यात हॉटेल मंत्रा (ट्रॉय), फ्लाय मौक हॉटेल, बिट्स कॅफे, हॉटस्पॉट कॅफे, वाल्लाज कॅफे, हार्ट बीट्स कॅफे, कॅफे डिलक्स व स्पा सेंटर येथे अचानक भेटी दिल्या. तेथील अनाधिकृत बांधकाम काढुन घेण्याबाबत संबंधितांना ताकीद देवुन काढुन घेण्यास भाग पाडले तसेच रहदारीस अडथळा होणारे फ्लेक्स, जाहिरातींचे बॅनर काढुन अतिक्रमण विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१ किरणकुमार चव्हाण, सहा. पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापुर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपुत, सहा. पोलीस निरीक्षक निखील पवार, पोलीस उप निरीक्षक शरद पाटील, पोहवा. गणेश रहेरे, पोअं शिवम साबळे, सतिष जाधव, प्रविण केदारे, निगळ यांनी केली आहे. तसेच महानगरपालिका विभागाकडील उपायुक्त मयुर पाटील, शिंगाडे तसेच अतिक्रमण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.