नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नाशिक महानगरपालिकेच्या चालू वर्षीय अर्थसंकल्पामध्ये ३ हजार ५३ कोटीचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला.
यामध्ये स्वच्छता कर, जल लाभ कर यात १ टक्का आणि मिळकत करात २ टक्के वाढ करण्यात आली असून मनपाच्या आर्थिक उत्पन्न वाढीसाठी मनपाच्या मालकीची शॉपिंग सेंटर, पार्किंग आदींद्वारे प्रयत्न करणार असल्याचे महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी सांगितले.
मनपाच्या लेखा व वित्त विभागांतर्गत सन २०२४-२५ चे सुधारित व सन २०२५-२६ चे मूळ अंदाजपत्रक स्थायी समितीच्या विशेष अंदाजपत्रकीय सभेत सादर करण्यात आले. नाशिक महानगर पालिकेच्या मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात झालेल्या या विशेष सभेमध्ये सुधारित आणि मूळ जमाखर्चाच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली.
आगामी सिंहस्थाच्या निमित्ताने मोठी आणि महत्त्वाची कामे शहराला जी पुढील १० ते १५ वर्षात अधिक चांगल्या तऱ्हेने उपयोगी होतील अशा कामांना प्राधान्य देऊन ती अग्रक्रमाने पूर्ण केली जाणार आहे.
नवीन रस्ते, जलवाहिनी, ड्रेनेज या महत्त्वपूर्ण कामांबरोबरच मनपाच्या मिळकत वाढीसाठी मनपाचे शॉपिंग सेंटर, पे अँड पार्क, तरण तलाव, उद्याने, गोदापार्क ही मिळकते आऊटसोर्सेसद्वारे देऊन त्याची देखभाल ही व्यवस्थित होईल आणि महापालिकेला देखील उत्पन्न मिळेल या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत.
नाशिक महानगरपालिकेला प्राप्त होणारे विविध कर, शुल्क फी अनुदाने व अन्य जमा लक्षात घेऊन मनपा कार्यक्षेत्रात करावयाची विकास कामे व पूर्वावयाच्या सेवांसाठी होणाऱ्या खर्चाचा प्राधान्यक्रम ठरवून योग्य ताळमेळ घालण्याचा प्रयत्न असल्याचे खत्री यांनी सांगितले.
सन २०२४-२५ च्या मंजूर अर्थसंकल्पानुसार डिसेंबर २०२४ पर्यंत नऊ माही कालावधीत प्रत्यक्ष जमा झालेला महसूल व करण्यात आलेल्या खर्चाचा आढावा घेण्यात आला आहे, तसेच उर्वरित तीन महिन्यांच्या कालावधीत प्राप्त होणारी जमा आणि खर्च गृहीत धरून सन २०२४-२५ चे सुधारित अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.
त्यानुसार ३२९.२६ कोटी आरंभीच्या शिल्लकेसह २६१८.८१ कोटी जमा व २५५२.५१ कोटी खर्चाचे सुधारित अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. तसेच सन २०२४-२५ च्या सुधारित अंदाजपत्रकानुसार अखेरीस ६६.३० कोटी शिल्लक राहणार असल्याचे महापालिकेच्या या अंदाजपत्रकात म्हटले आहे. या महासभेला सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.