नाशिक :- पॅरिस-ब्रेस्ट- पॅरिस (PBP) ही जागतिक स्तरावर सायकल क्षेत्रातील बहुनामांकित व प्रतिष्ठीत अशी स्पर्धा आहे.या स्पर्धेला सायक्लिंगमधील क्रिकेटचा वर्ल्डकप समजला जातो.
ऑडॅक्स क्लब पॅरिसियन आयोजित 1891 पासून दर चार वर्षांनी सत्ताविसाव्या वेळी फ्रान्समधील पॅरिस येथे दिनांक 20 ते 24 ऑगस्ट दरम्यान जागतिक पातळीवर पार पडलेल्या पॅरिस- ब्रेस्ट- पॅरिस (PBP) -2023, रॅन्डोनिअर या स्वयं-आधारित 1220 कि. मी. ब्रेव्हेट स्पर्धेत जगभरातून 8000 स्पर्धक सहभागी झाले होते. भारत देशातून 280 सायकलपटू या स्पर्धेत सहभागी होते. त्यात नाशिकच्या आठ सायकलिस्टस्ने या स्पर्धेचे आव्हान स्वीकारले. ही 1220 किलोमीटर ची सायकल स्पर्धा पूर्ण करण्यासाठी 90 तासाचा कालावधी दिला
जातो.
नाशिकचा अल्ट्रा- सायकलपटू विभव शिंदे याने केवळ 67 तास 51 मि. व 06 सेकंदात ही स्पर्धा पूर्ण केली व भारत देशातून चौथा तर महाराष्ट्रात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. भगूर येथील रहिवासी गणेश कुंवर या अल्ट्रासायकलिस्टने 73 तास 46 मि. 33 सेकंदात स्पर्धा पूर्ण करून भारतातून बारावे स्थान पटकविले. नाशिक सायकलिस्टस् फाउंडेशनचे अध्यक्ष आयर्नमॅन किशोर काळे यांनी 87 तास 20 मिनिट 20 सेकंदात ही स्पर्धा पूर्ण केली. नाशिकचे रेडिओलॉजिस्ट डॉ. राहुल सोनवणी यांनी 87 तास 59 मि. 32 सेकंदात ही स्पर्धा यशस्वी पूर्ण केली.
संगमनेर येथील रहिवासी विजय काळे यांनी 88 तास 12 मिनिट41 सेकंदात पूर्ण केली. आयर्न मॅन निलेश झवर यांनी शेवटपर्यंत झुंज देऊन फिनिश लाईन निर्धारित वेळेच्या काही तास उशिरा पूर्ण केली. या स्पर्धेत नाशिकच्या महिला सायकलिस्ट डॉ. अनिता लभडे यांनी 1017 कि.मी.अंतर पूर्ण केले. मानेचा प्रचंड त्रास होत असल्यामुळे ही स्पर्धा थोड्या अंतरासाठी त्यांना सोडावी लागली. आयर्न मॅन नीता नारंग यांनी ब्रेस्ट पर्यंतचे अर्धे अंतर पार करून पुढच्या चेक पॉइंटला पोहोचल्या त्यानंतर गुडघ्याची सूज वाढली व वेदना सहन न झाल्याने ही स्पर्धा सोडावी लागली.
या अष्टपैलू सायकल पटूंनी भारताचे प्रतिनिधित्व केले व भारताचा तिरंगा पॅरिस मध्ये अभिमानाने फडकविला. त्याबद्दल नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या सदस्यांनी एकच जल्लोष केला. हा आनंद वात्सल्य वृद्धाश्रम येथील विशेष आजी बाबा यांच्या सोबत केक कापून व मिठाई वाटप करुन साजरा करण्यात आला.