नाशिकरोड (प्रतिनिधी) : जुन्या घराचे लाकडी छत अंगावर पडल्याने एका वृद्ध कामगाराचा मृत्यू झाला. जेलरोड, उपनगर येथे बांधकाम सुरू असताना ही दुर्घटना घडली.
दीपावलीच्या काळातच ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. मधुकर यादवराव बोबडे (वय 59, प्लॅट नं. 303, श्रेयस पार्क, अशोका शाळेजवळ, चांदसी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जेलरोड येथील प्रियंका बंगला येथे अनमोल कैलास केडिया यांच्या बंगल्याचे बांधकाम सुरु आहे. मधुकर यादवराव बोबडे हे काल अनमोल केडिया यांच्या बांधकामाच्या ठिकाणी कामासाठी गेले होते. काम सुरू असताना सकाळी अकराच्या सुमारास जुन्या घराचे लाकडी छत अचानक बोबडे यांच्या अंगावर पडले.
त्यात मधुकर बोबडे यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली. त्यांना त्यांचा भाचा बलभीम शेळके याने तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. उपनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.