देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकला आता विविध गुन्ह्यांचं ग्रहण लागलय. नाशिकमध्ये एका भोंदूबाबाबाने महिलेवर अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच एका ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. २४ वर्षीय आरोपीने चिमुकलीसोबत अत्याचार करून तिची हत्या केलीय. नाशिकच्या मालेगाव तालूक्यातील डोंगराळे येथे ही मन सुन्न करणारी घटना घडलीय.
प्राथमिक माहितीनुसार, डोंगराळे येथे ३ वर्षांच्या मुलगी आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होती. या गावामध्ये राहणाऱ्या २४ वर्षीय तरुणाने चिमुकलीसोबत अत्याचार केले. त्यानंतर ही गोष्ट तिने कुणाला सांगू नये म्हणून त्याने तिची हत्या केली. विजय संजय खेरनार (२४ वर्षे) असं आरोपी तरुणाचे नाव आहे. विजयने मुलीची हत्या केल्यानंतर तो फरार झाला होता.
या घटनेची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आरोपीचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी मालेगाव मेडिकल कॉलेजमध्ये पाठवला. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. या घटनेमुळे नाशिकमध्ये संतापाचे वातावरण आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.