नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : घराच्या दरवाजाचे लॅचलॉक तोडून अज्ञात चोरट्याने घरातील कपाटातून 12 तोळे सोन्याचे व हिर्यांचे मंगळसूत्र असा सुमारे पावणेपाच लाखांचा ऐवज घरफोडी करून चोरून नेल्याची घटना कामटवाडा येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी नितीन पंढरीनाथ संदांशी (रा. पृथ्वी बंगला, अभियंतानगर, कामटवाडा, सिडको) हे दि. 9 ते 11 नोव्हेंबर या कालावधीत बाहेरगावी होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाजाचे लॅचलॉक व टॉवर बोर्ड कशाच्या तरी सहाय्याने तोडून घरात प्रवेश केला.
त्यानंतर बेडरूममध्ये असलेले लाकडी कपाटाचे लॉकर उघडून त्यात असलेले 81 हजार रुपये किमतीचे 27 ग्रॅम वजनाचे सोन्याचे वेढे, 1 लाख 80 हजार रुपये किमतीची 60 ग्रॅम वजनाची सोन्याची पाटली, 90 हजार रुपये किमतीच्या 30 ग्रॅम वजनाच्या 4 नग सोन्याच्या बांगड्या, 30 हजार रुपये किमतीची 10 ग्रॅम वजनाची सोन्याची दोन मंगळसूत्रे, 60 हजार रुपये किमतीचे हिर्यांचे मंगळसूत्र व 40 हजार रुपये किमतीची हिर्यांची बांगडी असा एकूण 4 लाख 81 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने घरफोडी करून चोरून नेला.
या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घुणावत करीत आहेत.