नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- एर्टिगा कार विक्री करण्याचे आमिष दाखवून एका सलून दुकानदाराच्या अडीच लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी एका भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी जयदीप रवींद्र बोरसे (रा. सावतानगर, सिडको) यांचे कॅनडा कॉर्नर येथे द जे. डी. हेअर वर्ल्ड या नावाचे सलून दुकान आहे. या दुकानात आरोपी विशाल ऊर्फ बंटी शरद कोळी (रा. वृंदावननगर, आडगाव शिवार) हा आला. कोळी याने त्याच्याकडे असलेली एमएच 03 सीएस 1403 या क्रमांकाची एर्टिगा गाडी विक्री करण्याचे आमिष दाखवून फिर्यादी बोरसे याचा विश्वास संपादन केला.
या गाडीचा व्यवहार करण्याच्या बहाण्याने फिर्यादीकडून व्यवहारापोटी 1 लाख 25 हजार रुपये ऑनलाईन फोन पेद्वारे व 90 हजार रुपये रोख असे एकूण 2 लाख 28 हजार रुपये फिर्यादीकडून घेतले; मात्र ही गाडी फिर्यादीला विक्री न करता त्या रकमेचा स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी अपहार करून आरोपी विशाल कोळी याने फिर्यादीचा विश्वासघात करून फसवणूक केली.
तसेच फिर्यादीची इच्छा नसताना फिर्यादीला मोबाईल विक्रीतून आलेले 20 हजार रुपये फिर्यादीच्या हातातून बळजबरीने हिसकावून घेतले, तसेच फिर्यादीने कोळी याच्याकडे गाडीबाबत विचारणा केली असता त्याने फिर्यादीला शिवीगाळ व दमदाटी केली. हा प्रकार दि. 19 जून ते 1 नोव्हेंबर या काळात घडला. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात विशाल कोळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डगळे करीत आहेत.